महाराष्ट्रात मानवी तस्करीचे वाढते संकट; देशात दुसऱ्या क्रमांकावर, 2024 मध्ये 337 गुन्ह्यांची नोंद
देशातील मानवी तस्करीच्या घटनांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदवही ब्युरोच्या (NCRB) क्राईम इन इंडिया 2024 अहवालानुसार, राज्यात महिला, मुली आणि लहान मुलांची लैंगिक शोषण, सक्तीची मजुरी आणि इतर कारणांसाठी मोठ्या प्रमाणात मानवी तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. विविध जिल्ह्यांमध्ये मानव तस्करीविरोधी पथके (AHTU) कार्यरत असूनही संघटित गुन्हेगारी टोळ्या अजूनही सक्रिय असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये तेलंगणामध्ये सर्वाधिक 423 मानवी तस्करीचे गुन्हे दाखल झाले, तर महाराष्ट्रात 337 प्रकरणांची नोंद झाली. राज्यात 2023 मध्ये 388 आणि 2022 मध्ये 295 गुन्हे नोंदवले गेले होते. यावरून मानवी तस्करीचे प्रमाण सातत्याने गंभीर असल्याचे स्पष्ट होते.
अहवालानुसार, 2024 मध्ये महाराष्ट्रात मानवी तस्करीचे एकूण 892 बळी आढळून आले. त्यापैकी 78 अल्पवयीन असून त्यात 52 मुली आणि 26 मुलांचा समावेश आहे. तसेच 814 प्रौढ बळींमध्ये 798 महिला आणि मुली, तर 16 पुरुष आहेत. यावरून महिला आणि मुली हेच मानवी तस्करीचे प्रमुख लक्ष्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील पोलीस आणि तपास यंत्रणांनी वर्षभरात 885 पीडितांची सुटका केली. त्यामध्ये 808 भारतीय नागरिक, 20 बांगलादेशी नागरिक आणि 57 इतर विदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे मानवी तस्करीचे जाळे राज्यापुरते मर्यादित नसून त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूपही असल्याचे दिसून येते.
मानवी तस्करीमागील प्रमुख कारण म्हणून व्यावसायिक लैंगिक शोषण समोर आले आहे. राज्यातील 829 जणांची वेश्याव्यवसायासह व्यावसायिक लैंगिक शोषणासाठी तस्करी करण्यात आली. याशिवाय 46 जणांना सक्तीच्या मजुरीसाठी, तर 4 जणांना सक्तीच्या विवाहासाठी तस्करी करण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, तस्कर विविध आमिषे दाखवून किंवा दबाव टाकून महिलांना, मुलींना आणि मुलांना वेश्याव्यवसाय, घरगुती गुलामी, वेठबिगारी, बालविवाह, संघटित भिक्षावृत्ती तसेच नवजात बालकांच्या अवैध विक्रीसारख्या गुन्हेगारी कारवायांमध्ये ढकलत आहेत. या गुन्ह्यांमध्ये महिला, किशोरवयीन मुली आणि लहान मुले सर्वाधिक असुरक्षित असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
Comments are closed.