मला ट्रोलिंग होईल मात्र बोलणं गरजेच; निवृत्तीच्या भाषणावरुन निलम गोऱ्हेंची ठाकरेंवर बोचरी टीका

मुंबई: विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून विधानपरिषदेतील 9 आमदारांचं हे शेवटचं अधिवेशन होतं. त्यामुळे, या 9 आमदारांच्या कार्यावर प्रकाश टाकत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्‍यांनी त्यांच्या कामाचं कौतुक करत त्यांना निरोप दिला. विशेष म्हणजे, निवृत्त होणाऱ्या विधानपरिषद सदस्यांमध्ये शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समावेश होता. तसेच, नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील, संजय केनेकर यांच्यासह नऊ सदस्य मे महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यामुळे, सभागृहात काहीसं भावनिक वातावरण होतं. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसमवेतच्या आठवणींना उजाळा दिला. तर, उद्धव ठाकरे साहेब म्हणत एकनाथ शिंदेंनीही शुभेच्छा दिल्या. त्यावर, बोलताना उद्धव ठाकरेंनी कवितांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना चिमटे काढले. आता, उद्धव ठाकरेंच्य कवितापर भाषणवरुन निलम गोऱ्हेंनी (Neelam gorhe) पलटवार केला आहे.

षड्यंत्राची भेट घालून बसलो
ज्याला माझा हात धरून बसावे लागले
तो बसून धरला हे नवलच!

अशी शायरी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसाठी म्हटली होती, तसेच उद्धव ठाकरेंचा पिंड राजकारणाचा नसून ते उत्तर कलाकार, फोटोग्राफर असल्याचेही त्यांनी म्हटलं होतं. त्यावर, माझा पिंड हा राजकारणाचा नाही, माझा मूळ स्वभाव कलाकाराचा आहे. एवढं उत्तम वर्णन केल्यानंतर, एवढं तुम्ही जवळून ओळखता म्हणल्यानंतर ऐसी कौनसी बात थी और किसका हात पकडना पडा, असा सवाल उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात केला. तसेच, उद्धवा अजब तुझे सरकार.. असे म्हणत कवितेच्या माध्यमातून फडणवीसांसह शिंदे गटालाही लक्ष्य केलं. आता, शिंदे गटाकडून निलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर पटलवार केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी कविता वाचून दाखवली, ती कविता ही त्यांच्या बाबतचीच होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यामुळे आम्हाला बरं वाटलं. पण शेवटच्या 1 वर्षात आमचा भ्रमनिरास झाला. हे वर्ष-वर्ष कुणाला भेटत नव्हते, तिथ गेलं की लक्षात यायचं की यांना आम्ही नको आहोत. अहो हे अधिकाऱ्यांना देखील भेटत नव्हते. मिलिंद तर सारख्या आमच्या टेस्ट करायचा, असे म्हणत निलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. कोविडमध्ये काम केलं असं ते म्हणतात, अहो शिंदेसाहेब सुद्धा काम करत होते. त्यांनी पिपीई किट घालून काम केलं ना. ते म्हणाले रेडा कापला, अहो तुम्ही श्रद्धेच्या नावाने काय काय करत होतात हे माहिती आहे. प्रत्येकवेळा कही पे निगाहे कही पे निशाणा सारखं सारखं कशाला? असा सवाल निलम गोऱ्हेंनी केला. तसेच, मला माहिती आहे, मला खूप ट्रोलिंग होईल मात्र बोलण गरजेच आहे असेही त्यांनी म्हटले.

लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा
मी पणाचा दिमाख तुटला
अंतरंगी आवाज उठला
ऐरणीचा सवाल सुटला
या कहाणीचा..

असे म्हणत निलम गोऱ्हेंनी देखील उद्धव ठाकरेंना कवितेतून प्रत्युत्तर दिलंय.

हेही वाचा

अजितदादांचं स्मरण, मविआ सरकारचा लेखा जोखा सादर, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीन मागण्या, उद्धव ठाकरे शेवटच्या भाषणात काय म्हणाले?

आणखी वाचा

Comments are closed.