नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद

नवी दिल्ली : देशभरात गाजलेल्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या आरोपी मनीषा वाघमारे हिच्या जामीन अर्जावर दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. या जामीन अर्जावर कोर्ट आता 9 जून रोजी आपला अंतिम निर्णय सुनावणार आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्ट आणि सीबीआयने मनीषा वाघमारेच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला.

या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे आणि अनेक गोष्टी प्रलंबित आहेत, अशा परिस्थितीत तुम्ही इतक्या घाईत जामीन अर्ज का दाखल केला? असा थेट सवाल न्यायाधीश अजय गुप्ता यांनी आरोपीच्या वकिलांना विचारला. त्यावर उत्तर देताना मनीषा वाघमारेच्या वकिलांनी सांगितलं की, सीबीआयच्या तपासात आतापर्यंत आमच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. तसेच, वाघमारे या सर्टिफाइड एज्युकेशन काउन्सलर असून, त्यांना समुपदेशन फी नियमितपणे मिळत असते, असा दावाही वकिलांनी केला.

CBI ज्या 3.50 लाख रुपयांच्या संशयास्पद बँक एन्ट्रीचा उल्लेख करत आहे, ते पैसे मनीषा वाघमारेला तिच्या पूर्वजांच्या मालमत्तेच्या ‘गिफ्ट डीड’मधून आले होते, असं वकिलांनी कोर्टात स्पष्ट केलं. त्यांच्या बँक खात्यात कोणताही संशयास्पद व्यवहार नाही आणि सीबीआयने दोनदा घराची झडती घेऊनही कोणतीही रोख रक्कम जप्त केलेली नाही, त्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवणे अयोग्य आहे, असा युक्तिवाद वकिलांनी केला.

Medical Grounds Argument : प्रकृती अस्वास्थ्याचे कारण; कोर्टाने युक्तिवाद फेटाळला

मनीषा वाघमारेच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलं की, मनीषा वाघमारे यांचे वय 47 वर्षे असून, त्या गेल्या काही काळापासून ‘व्हर्टिगो’ (चक्कर येणे) या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्या शारीरिक आजाराशी संबंधित सर्व वैद्यकीय नोंदी कोर्टात सादर करण्यात आल्या आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे सोमवारी त्यांना तुरुंगातील रुग्णालयात दाखल करावे लागले होते, त्यामुळे तुरुंग प्रशासनाकडूनही याच्या नोंदी मागवता येतील. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा. सीबीआयला चौकशीसाठी जिथेही गरज असेल, तिथे त्या पूर्ण सहकार्य करतील, असं वकिलांनी स्पष्ट केलं. सीबीआयनं त्यांचे दोन मोबाईल फोन आधीच जप्त केले आहेत.

मात्र, कोर्टाने वकिलांचा हा वैद्यकीय युक्तिवाद फेटाळून लावला. वैद्यकीय समस्यांचा मुद्दा जामिनाशी जोडून पाहू नका. तुरुंग प्रशासनाकडे सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून ते कैद्यांची पूर्ण काळजी घेऊ शकतात. प्रकृतीबाबत आणखी काही अडचण असेल, तर त्यासाठी वेगळा अर्ज दाखल करा, असं कोर्टानं स्पष्ट केलं.

CBI Opposition Arguments : मनीषा वाघमारे ब्यूटी पार्लर चालवायच्या

सीबीआयने जामीन याचिकेला कडाडून विरोध करताना सांगितलं की, मनीषा वाघमारे स्वतःला शिक्षण समुपदेशक म्हणवत असल्या, तरी त्या एक ब्यूटी पार्लर चालवतात. त्यांनी केमिस्ट्री, बायोलॉजी आणि फिजिक्सचे प्रश्न लोखंडे नावाच्या व्यक्तीला दिले होते, जे पुढे शुभमपर्यंत पोहोचले. त्या विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कम घेऊन नीट परीक्षेचे अनेक प्रश्न लीक करत होत्या.

सीबीआयने कोर्टाला सांगितलं की, आमच्याकडे अशा अनेक विद्यार्थ्यांचे अधिकृत जबाब आहेत, ज्यांनी मनीषा वाघमारे यांना पेपरसाठी पैसे दिल्याची कबुली दिली आहे. यावर कोर्टाने स्पष्ट केलं की, सीबीआयने नोंदवलेल्या विद्यार्थ्यांच्या जबाबांचा सविस्तर अभ्यास केला जाईल आणि मनीषाविरुद्ध नेमके काय पुरावे आहेत, हे पाहूनच निर्णय दिला जाईल.

Nagpur Student Suicide : नीट परीक्षेच्या तणावातून विद्यार्थीनीने जीवन संपवलं

दरम्यान, नागपूरमधून ‘नीट’ परीक्षेच्या तणावाशी संबंधित एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी अपडेट समोर आली आहे. 20 मे रोजी 19 वर्षीय आकांक्षा चतुर्वेदी या विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. सुरुवातीला पोलीस आणि कुटुंबीयांना तिने वैयक्तिक तणावातून हे पाऊल उचलल्याचा संशय होता. मात्र, आता आकांक्षाची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागल्याने या प्रकरणात मोठी खळबळ उडाली आहे. “नीटची फेरपरीक्षा (Re-exam) देण्याची माझ्यात अजिबात हिंमत नाही,” असं आकांक्षाने आपल्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे, ज्यामुळे पेपरफुटी आणि परीक्षांच्या तणावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ही बातमी वाचा :

आणखी वाचा

Comments are closed.