NEET ची पुनर्परीक्षा प्रक्रिया पुन्हा छाननी अंतर्गत

बिहारमध्ये डमी उमेदवारांनी सोडविला पेपर : सहा विद्यार्थ्यासह 24 जणांना अटक

वृत्तसंस्था/ लखीसराय

बिहारमधील लखीसराय पोलिसांनी देशातील प्रतिष्ठित नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षा पद्धतीमध्ये घोळ निर्माण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करत जिह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर छापे टाकत डमी उमेदवार आणि त्यांच्याशी संबंधित टोळीला पकडले. ‘नीट’सारख्या राष्ट्रीय परीक्षेतील अशा घटनांमुळे पुन्हा एकदा परीक्षा पद्धतीच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावेळी सुरक्षा व्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक कडक असूनही काही व्यक्तींनी तंत्रज्ञान आणि संगनमताच्या माध्यमातून प्रणालीला चकमा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

लखीसराय येथील केंद्रावर काही ठिकाणी डमी उमेदवारांनी प्रश्नपत्रिका सोडवल्याचे प्रकार उघड झाले असून त्यांनी खऱ्या उमेदवारांच्या जागी बसण्यासाठी 30 ते 40 लाख रुपयांचा सौदा केला होता. पोलिसांनी या प्रकरणात टोळीचा म्होरक्या आणि पीएमसीएच, गयाजी मेडिकल कॉलेज, एम्स रायबरेली आणि बीएसयू येथील वैद्यकीय विद्यार्थ्यांसह एकूण 24 जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये दोन इंटर्न डॉक्टर, पाच एमबीबीएस विद्यार्थी आणि इतरांचा समावेश आहे.

अटक केलेल्या आरोपींमध्ये परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचे बोटांचे ठसे घेणाऱ्या बायोमेट्रिक कंपनीच्या 14 कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. काही जागी बनावट उमेदवार परीक्षा देत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी हसनपूर येथील शासकीय हायस्कूल, केआरके उच्च माध्यमिक शाळा आणि केंद्रीय विद्यालयावर छापे टाकून सर्व आरोपींना पद्धतशीरपणे अटक केली. लखीसरायच्या पोलीस अधीक्षक प्रेरणा यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींकडून मोबाईल फोन आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

बायोमेट्रिक कंपनीच्या नावे परीक्षा केंद्रात घुसखोरी

हाजीपूरचा रहिवासी असलेला मयंक कश्यप हा पीएमसीएचचा विद्यार्थी आहे. एनटीएने बायोमेट्रिक पडताळणीची जबाबदारी सोपवलेल्या खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी मयंकने संगनमत केले. त्यानंतर तो कर्मचारी असल्याचे भासवून हसनपूरच्या परीक्षा केंद्रात घुसला. मात्र, पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. मयंकच्या कसून चौकशीनंतरच बायोमेट्रिक कंपनीचे इतर कर्मचारीही पकडले गेल्यामुळे हे मोठे प्रकरण उघडकीस आले.

बायोमेट्रिक प्रणालीतून एक मोठा खुलासा

तपासादरम्यान, बायोमेट्रिक हजेरी प्रणालीमध्ये संशयास्पद हालचाल आढळून आली. परीक्षा केंद्रांवर बोटांचे ठसे आणि फोटो जुळवले गेले असता अनेक उमेदवारांची माहिती जुळली नसल्यामुळे काहीतरी गैरप्रकार झाल्याचा संशय आला. त्यानंतर तात्काळ कारवाई करत काही संशयितांना घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले.

30-40 लाखांपर्यंत सौदा व्यवहार

हे केवळ फसवणुकीचे प्रकरण नसून हे एक संघटित सूत्रधारांचे नेटवर्क होते, असे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खऱ्या उमेदवारांच्या जागी डमी उमेदवार बसविण्याचा सौदा झाला होता. ही रक्कम 30 ते 40 लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. या नेटवर्कमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी सामील होते.

Comments are closed.