तृणमूल काँग्रेसचे नेते मोईत्रा अडचणीत.
असंतुष्ट खासदार सादर करणार मानहानी प्रकरण
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तृणमूल काँग्रेसच्या लोकसभा खासदार आणि नेत्या महुआ मोईत्रा या संकटात सापडतील अशी शक्यता आहे. या पक्षाचे असंतुष्ट नेते आणि आता अन्य पक्षात विलीन झालेले 20 खासदार मोईत्रा यांच्या विरोधात मानहानी प्रकरण सादर करण्याच्या विचारात आहेत, अशी माहिती आहे. पक्ष सोडण्यासाठी या खासदारांना मोठी लाच देण्यात आली आहे, असा आरोप मोईत्रा यांनी काही दिवसांपूर्वी केला आहे. तथापि, आम्ही तृणमूल काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींच्या कार्यपद्धतीला आणि मनमानीला कंटाळून त्या पक्षाबाहेर पडलो असे या खासदारांचे म्हणणे आहे.
उबाठा शिवसेनेचेही 6 खासदार त्या पक्षातून बाहेर पडले असून त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे संतप्त झालेले उबाठा सेनेचे नेते संजय राऊत यांनी या खासदारांवर अनेक आरोप केले आहेत. या खासदारानी फुटण्यासाठी प्रत्येकी 15 कोटी रुपये आगाऊ रक्कम म्हणून घेतली असून प्रत्यक्ष फुटीनंतर त्यांना प्रत्येकी आणखी 35 कोटी रुपये मिळतील. अशा प्रकारे प्रत्येक खासदार 50 कोटी रुपयांना विकत घेतला गेला आहे, अशा अर्थाचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यानंतर महुआ मोईत्रा यांनी, तृणमूल काँग्रेसचे खासदारही अशाच प्रकारे फोडल्याचा आरोप केला होता.
प्रत्येक खासदाराला 50 कोटी ?
तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येक खासदाराला प्रथम 14 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच यापुढे त्यांना प्रत्येक महिन्याला प्रत्येकी एक कोटी रुपये, याप्रमाणे पुढचे 36 महिने रक्कम देण्यात येणार आहे. अशा प्रकारे प्रत्येक खासदाराला तीन वर्षांमध्ये प्रत्येकी 50 कोटी रुपये दिले जाणार आहेत, असे मोईत्रा यांचे म्हणणे असून त्यांनी ते जाहीररित्या मांडले आहे. त्यामुळे पक्षांतर केलेले हे खासदार दुखावले गेले आहेत. तृणमूल काँग्रेस पक्ष सोडताना कोणताही आर्थिक व्यवहार आम्ही केलेला नाही. तसेच आम्हाला कोणीही कोणतीही रक्कम दिली गेलेली नाही आणि आम्ही ती मागितलेलीही नाही, असे प्रतिपादन या खासदारांनी केले आहे.
मोईत्रा यांनी केली मानहानी
मोईत्रा यांनी कोणत्याही पुराव्याशिवाय केवळ स्वत:च्या कल्पनेतून आमच्यावर धादांत खोटे आरोप केले आहेत. त्यामुळे आमची बदनामी झाली आहे. या मानहानीमुळे आम्हाला त्रास झाला असून मोईत्रा यांच्या विरोधात लवकरच न्यायालयात मानहानीचे प्रकरण सादर करण्यात येईल, असे या खासदारांच्या नेत्या काकोली घोष दस्तीदार यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
Comments are closed.