एकीकडे मृतदेहांची मोजणी, बेपत्तांचा शोध सुरू; तर दुसरीकडे पुरात वाहून आलेली तिजोरी फोडून लाखोंची लूट, 29 जणांना अटक, मृतदेहांवरील दागिनेही ओरबाडले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नेपाळमध्ये महापुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 626 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 2400 हगून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. एकीकडे मृतदेहांची मोजणी, बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू असून दुसरीकडे माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनाही समोर येत आहेत. महापुराच्या प्रचंड वेगात वाहून आलेली बँकेची तिजोरी फोडून त्यातून लाखो रुपये लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 29 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

रसुवा येथील भोटेकोशी परिसरात आलेल्या महापुरात एका बँकेची भलीमोठी तिजोरी वाहून गेली होती. ही तिजोरी त्रिशूली नदीच्या पात्रातून वाहत धाडिंग जिल्ह्यातील गल्छी गावपालिका-4 मधील बेलखूखोला जवळ येऊन अडकली. महापुराचे पाणी ओसरल्यानंतर स्थानिक नागरिकांनी ही तिजोरी पाहिली आणि काही लोकांनी ती फोडून त्यातील रोख रक्कम पळवून नेली.

तिजोरी फोडून रक्कम लुटल्याची माहिती मिळताच धाडिंग पोलिसांनी तातडीने पथक पाठवून तपास सुरू केला. पोलिसांनी याप्रकरणी 19 ते 49 वयोगटातील 29 संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल 92 लाख 68 हजार 505 नेपाळी रुपये (सुमारे 57 लाख रुपये) जप्त करण्यात आले आहेत. हे सर्व आरोपी गल्छी, सिद्धलेक तसेच चितवन आणि पर्सा भागातील रहिवासी आहेत. या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

मृताच्या अंगावरील दागिनेही चोरले

तत्पूर्वी नारायणी नदीत वाहून आलेल्या एका महिलेच्या मृतदेहावरील सोन्याचे दागिने काढून घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. संकट समयी मदत करण्याऐवजी मृतदेहाची लूट करणाऱ्या या विकृतीमुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Comments are closed.