भारताला मोठा धक्का! नीरज चोप्रा एशियन गेम्स 2026 आणि डायमंड लीग फायनल स्पर्धांमधून बाहेर, पोस्ट शेअर करत दिली माहिती

आपल्या पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णकामगिरी करणाऱ्या स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतही पदक पटकावले (2020, 2024). शनिवारी (29 ऑगस्ट) त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत एक धक्कादायक माहिती सांगितली आहे.

नीरजने संपूर्ण चालू हंगामातून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडियावर माघार घेत असल्याची पोस्ट शेअर केली. सरावादरम्यान त्याला घोट्याची दुखापत झाल्याचे (लिगामेंट फाटल्याचे) समोर आले. त्यामुळे तो 4 ते 5 सप्टेंबर रोजी ब्रुसेल्समध्ये होणाऱ्या डायमंड लीग फायनल्स आणि जपानमधील आशियाई खेळांमधून (Asian Games 2026) बाहेर पडला आहे. त्याचा हा निर्णय भारतासाठी धक्कादायकच आहे.

नीरजने नुकतेच लॉझान डायमंड लीगमध्ये 88.05 थ्रो करत डायमंड लीग फायनलसाठी पात्रता मिळवली होती. त्याचा हा या हंगामातील सर्वोत्तम थ्रो होता. आशियाई खेळांआधी त्याला आपला फॉर्म आणि फिटनेस तपासण्यासाठी ही फायनल महत्त्वाची होती, मात्र त्याला दुखापत झाली.

नीरजने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “कठोर मेहनतीनंतर अखेर मला अपेक्षित लय मिळत असल्याचे जाणवत होते. लॉझानमध्ये हंगामातील सर्वोत्तम थ्रो केल्यानंतर माझा आत्मविश्वासही वाढला होता. पण दुर्दैवाने, त्यानंतर सरावादरम्यान माझ्या घोट्याच्या लिगामेंटला दुखापत झाली. डॉक्टर आणि टीमसोबत चर्चा केल्यानंतर उर्वरित हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.”

“हा निर्णय नक्कीच निराशाजनक आहे, विशेषतः जेव्हा मी पुन्हा माझ्या सर्वोत्तम लयीत येण्याच्या जवळ होतो. पण प्रत्येक अडथळा हा प्रवासाचाच एक भाग असतो. आता माझे लक्ष पूर्णपणे बरे होण्यावर आणि आणखी दमदार पुनरागमन करण्यावर आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद,” असे नीरजने पुढे त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या वर्षाच्या उर्वरित हंगामातील नीरजची अनुपस्थिती भारतीय क्रीडा आणि ऍथलेटिक्ससाठी एक मोठा धक्का आबे. गतविजेता म्हणून, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सर्वात मोठा सुवर्णपदकाचा दावेदार असलेला नीरज आता बाहेर झाल्याने त्याचा देशाच्या पदक मोहिमेवर परिणाम होईल. (Major setback for India! Neeraj Chopra to miss Asian Games 2026 and Diamond League Final due to ‘this’ reason.)

Comments are closed.