नेतान्याहूंचा इराणविरोधात नवा युद्धाचा प्लॅन, ट्रम्प मात्र ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत
इराण आणि इस्रायल यांच्यात पुन्हा एकदा लष्करी संघर्ष भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणविरुद्ध आणखी एक लष्करी मोहीम अपरिहार्य असल्याचे मत इस्रायलचे काळजीवाहू पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी व्यक्त केले आहे. इराणवर नव्याने हवाई हल्ले करण्यासाठी नेतान्याहू अमेरिकेचा पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र या प्रकरणात सावध भूमिका घेतली असून, इराणविरोधात तातडीने कोणताही निर्णय घेण्याची घाई नसल्याचे स्पष्ट केले आहे.
‘द टाइम्स ऑफ इस्रायल’ने इस्रायलमधील ‘चॅनेल १३’च्या वृत्ताचा हवाला देत यासंदर्भातील माहिती दिली आहे. नेतान्याहू यांनी अलीकडेच वरिष्ठ मंत्री आणि सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकांमध्ये इराणविरुद्ध पुन्हा लष्करी कारवाई करावी लागेल, असे मत मांडले. यासाठी अमेरिकेची साथ मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेच्या पाठिंब्याने इराणविरुद्ध चार ते सात दिवसांची हवाई मोहीम राबवण्याची तयारी सुरू असल्याचेही वृत्त आहे.
एनडीटीव्ही ने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायल संरक्षण दलाच्या (आयडीएफ) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल आणि अमेरिकेच्या सेंट्रल कमांडमधील अधिकाऱ्यांनी संभाव्य हल्ल्याच्या योजनांवर चर्चा केली असून, त्यांना मंजुरीही देण्यात आली आहे. आता ही मोहीम नेमकी कधी सुरू करायची, यावर निर्णय होणे बाकी असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
Comments are closed.