क्लिनर अपहरण प्रकरणात दिलीप खेडकरचा जामिनासाठी प्रयत्न; मनोरमा खेडकर सहकार्य करेना, सुनावणी कधी
नवी मुंबई: क्लीनरच्या अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या मनोरमा खेडकरने (Manorama Khedkar) पोलिसांना चकवा देत अटकपूर्व जामीन मिळवल्यानंतर आता आरोपी दिलीप खेडकर याने बेलापूर कोर्टात आज जामिनासाठी अर्ज केला आहे . शनिवारी या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने हा जामीन देण्यास नकार दिला होता .
तर दुसरीकडे, या प्रकरणात पहिल्यापासून मनोरमा खेडकर पोलिसांच्या डोक्याचा ताप वाढवत असल्याचेच दिसून आले आहे . क्लीनर अपहरण प्रकरणात मनोरमा खेडकर ने थेट वकिलासोबत न्यायालय गाठत अटकपूर्व जामीन मिळवला होता . आता या प्रकरणाच्या सुनावण्या सुरू असताना मनोरमा खेडकर तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे . या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
आरोपी दिलीप खेडकरचा जामिनासाठी अर्ज
चर्चेत असलेल्या क्लिनर अपहरण प्रकरणातील आरोपी दिलीप खेडकर याने बेलापूर न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, आज या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. शनिवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने जामीन मंजूर केला नव्हता. या प्रकरणात दिलीप खेडकरवर अपहरणाचा गंभीर गुन्हा दाखल आहे. तसेच त्याच्याविरोधात यापूर्वी सात गुन्ह्यांची नोंद असल्यामुळे रबाळे पोलिसांकडून जामीनाला तीव्र विरोध केला जाणार आहे.
मनोरमा खेडकर तपासात सहकार्य करेना
दरम्यान, या प्रकरणातील एक महत्त्वाची साक्षीदार मनोरमा खेडकर तपासात सहकार्य करीत नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी तिला सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेत चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना दिली होती. मात्र, निर्धारित वेळ संपल्यानंतर ती रबाळे पोलिसांकडे चौकशीसाठी पोहोचली. संध्याकाळी 6 नंतर महिलांची चौकशी करता येत नसल्याने या नियमाचा फायदा घेण्याचा मनोरमा खेडकर हिचा प्रयत्न असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य फिर्यादी प्रल्हाद कुमार भीतीमुळे गावाकडे निघून गेला असल्याची माहिती समोर आली आहे.
दिलीप खेडकरने नवी मुंबईतून एका क्लीनरचे अपहरण केल्यानंतर रबाळे पोलीस तपासासाठी थेट पुण्यातील बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर यांच्या बंगल्यावर पोहोचले होते. त्यावेळी मनोरमा खेडकरने पोलिसांना, “तुम्ही पोलीस स्टेशनला जा, मी नवऱ्याला घेऊन येते,” असे आश्वासन दिले होते. पोलिसांनी तिच्या शब्दांवर विश्वास ठेवला. मात्र त्यानंतर दिलीप व मनोरमा खेडकर दोघेही पसार झाले होते.
आणखी वाचा
Comments are closed.