नायजेरियामध्ये मोठा अपघात – अंत्यविधीसाठी लोकांना घेऊन जाणारी बोट उलटली; 24 जणांचा मृत्यू
दक्षिण नायजेरियात अंत्यविधीसाठी प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटून झालेल्या भीषण दुर्घटनेत किमान 24 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आपत्कालीन सेवा विभागाने शनिवारी दिली. नायजेरियाच्या दक्षिण भागातील बायेल्सा राज्यात शुक्रवारी ही हृदयद्रावक घटना घडली.
राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेचे प्रवक्ते मांझो एझेकी यांनी दिलेल्या निवेदनानुसार, एका वस्तीतून दुसऱ्या वस्तीत अंत्यसंस्काराच्या विधीसाठी प्रवाशांना घेऊन जाणारी ही बोट पाण्यात बुडाली. घटनेनंतर तातडीने शोध आणि बचावकार्य सुरू करण्यात आले असून ते अद्याप सुरूच आहे. मात्र, नेमके किती प्रवासी बेपत्ता आहेत किंवा बोटीवर एकूण किती जण होते, याचा निश्चित आकडा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेला नाही. पोलीस प्रवक्ते मुसा मोहम्मद यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेतून अन्य 24 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
प्राथमिक अहवालानुसार बोटीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. बिघाड लक्षात येताच प्रवाशांनी बोट चालकाकडे बोट किनाऱ्याच्या दिशेने नेण्याची विनंती केली होती, परंतु त्याने त्यास नकार दिल्याचा आरोप मोहम्मद यांनी केला आहे. अपघातानंतर बोट चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी बोटीच्या व्यवस्थापकाला ताब्यात घेतले आहे. नायजेरियात सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीअभावी नादुरुस्त बोटी आणि लाईफ जॅकेटविना होणारा प्रवास यांमुळे अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचे चित्र पाहायला मिळते.
Comments are closed.