मायथोज एआय मॉडेलचा धसका, बँकिंग सिस्टीम हॅक होण्याची भीती, वित्तमंत्र्यांचा बँकांना अलर्ट

मानववंशीय मिथॉस एआय मॉडेल नवी दिल्ली : एआय कंपनी अँथ्रोपिकचं एआय मॉडेल मायथोज सध्या चर्चेत आहे. हे मॉडेल शक्तिशाली असल्यानं याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्यानं कंपनीनं सार्वजनिक वापरासाठी लाँच केलेलं नाही. मायथोज एआय सॉफ्टवेअरमधील बग्जचा शोध घेतं. ज्या बग्जचा शोध आजपर्यंत कोणी घेऊ शकलं नाही ते बग्ज शोधण्यात मायथोजला यश येतं. मायथोज एआय मॉडेलमुळं बँका आणि वित्तीय संस्थांना धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारमण यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या.

मायथोज शक्तिशाली एआय मॉडेल

मीडिया रिपोर्टनुसार, मायथोज एआय मॉडेलनं बँकांसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकांना सतर्क आणि सज्ज राहण्यासाठी सांगितलं आहे.वेगवेगळ्या वित्तीय संस्था आणि बँकांनी योग्य समन्वय ठेवण्याची गरज असल्याचं सीतारमण यांनी म्हटलं. या बैठकीला माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव देखील उपस्थित होते. रिपोर्टनुसार मायथोज मॉडेलसंदर्भात भारतानं अमेरिकेत अँथ्रोपिकच्या वरिष्ठ नेतृत्त्वाशी चर्चा करण्यात आली आहे.

निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मायथोजच्या धोक्यासंदर्भात चर्चा झाली. सीतारमण यांनी बँक अधिकाऱ्यांना सतर्कता  बाळगण्याचं आणि संरक्षणात्मक दृष्ट्या पाऊल उचलण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. बँकांनी त्यांच्या सिस्टीमला एआय मॉडेलपासून सुरक्षित बनवावं. याशिवाय इंडियन बँक असोसिएशनननं देखील संस्थात्मक मेकॅनिझम तयार करण्याचा सल्ला दिला, ज्याद्वारे वेगवान आणि परिणामकारक पद्धतीनं मायथोज मॉडेलचा सामना करता येईल. सीतारमण यांनी बँकांना त्यांच्या संरक्षणात्मक  सिस्टीम मजबूत करण्यासाठी बेस्ट सायबर तज्ज्ञांची मदत घेण्यास सांगितलं.

मायथोज मॉडेलची भीती का?

अँथ्रोपिकचं मायथोज मॉडेल शक्तिशाली असल्यानं जगभरात चिंता निर्माण झाली आहे. यामुळं कंपनीनं मायथोज मॉडेल सार्वजनिकरित्या लाँच केलेलं नाही. अँथ्रोपिकच्या दाव्यानुसार सायबर सिक्युरिटीसंदर्भातील टास्क, बग्ज शोधण्यासाठी आणि ते काढण्यासाठी हे मॉडेल माणसांना मागं टाकू शकतं. या मॉडेलनं काही सॉफ्टवेअरमधील कित्येक वर्ष जुन्या बग्जचा शोध घेतला आहे. यामुळं कंपनी त्यांच्या विश्वासार्ह भागीदारांसोबत त्याची चाचणी करत आहेत. या दरम्यान कोणत्या तरी ग्रुपनं या मॉडेलचा अप्रमाणित अॅक्सेस मिळवला आहे, त्यामुळं चिंता वाढली आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.