नाशिक स्थायी समिती सभापतीपदासाठी सस्पेन्स कायम, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही भाजपचा उमेदवार

NMC स्थायी समिती : नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी (Standing Committee Chairman Election) राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपचा (BJP) उमेदवार कोण असेल याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असतानाही पक्षाकडून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे शहराच्या राजकारणात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक 25 फेब्रुवारीला होणार आहे. आज (23 फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने दिवसभर राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

BJP : भाजपमध्ये लॉबिंग जोरात

सभापतीपदासाठी भाजपकडून अनेक नावांची चर्चा सुरू आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. महापौर-उपमहापौर निवडणुकीवेळी भाजपने ऐनवेळी शिवसेनेसह युती केल्याने सानप यांना उपमहापौर पदाची उमेदवारी मागे घ्यावी लागली होती. त्यामुळे आता त्यांना स्थायी समिती सभापतीपदाची संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याशिवाय महापौर पदाच्या शर्यतीत शेवटपर्यंत राहिलेल्या दीपाली कुलकर्णी आणि माधुरी बोलकर यांनीही सभापतीपदासाठी लॉबिंग सुरू केल्याची माहिती आहे. त्यामुळे अंतिम क्षणी कोणाच्या नावावर पक्षाची मोहर उमटते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shiv Sena: शिवसेना अर्ज दाखल करणार का?

महापालिकेच्या सत्तेत भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी आहेत. त्यामुळे उपमहापौर पदाप्रमाणेच शिवसेना स्थायी समिती सभापतीपदासाठी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करणार का, याचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र अद्याप याबाबत स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही.

NMC Standing Committee : स्थायी समितीवर भाजपचे वर्चस्व

महापालिकेच्या स्थायी समितीवर एकूण 16 सदस्य आहेत.

त्यापैकी 9 सदस्य भाजपचे आहेत.

4 सदस्य शिवसेना (शिंदे गट)

1 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस

तर 2 सदस्य शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांचे आहेत.

बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा भाजपकडेच असल्याने सभापतीपद भाजपकडेच जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

BJP : भाजपची सावध रणनीती

महापौर व उपमहापौर निवडणुकीवेळी फोडाफोडीची शक्यता लक्षात घेऊन भाजपने आपल्या सर्व नगरसेवकांना शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले होते. निवडणुकीच्या दिवशीच त्यांना महापालिकेत आणण्यात आले होते. त्याच धर्तीवर या निवडणुकीतही खबरदारी घेतली जाणार असल्याचे समजते. सोमवारी सकाळी भाजपकडून उमेदवाराची घोषणा होणार असून त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल. त्यानंतर सावधगिरीचा उपाय म्हणून भाजपचे 9 सदस्य सहलीवर पाठवण्याची तयारी असल्याची चर्चा आहे. त्यांच्यासोबत सत्तेत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनाही पाठवले जाऊ शकते.

NMC Standing Committee : 25 फेब्रुवारीला मतदान

या निवडणुकीचा कार्यक्रम विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता स्थायी समिती सभागृहात विशेष बैठक होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणी कोणाचे नाव पुढे येते आणि शिवसेना स्वतंत्र अर्ज दाखल करते का, याकडे संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा

BMC Swikrut Nagarsevak : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे दोन स्वीकृत नगरसेवक ठरले, नाराज आमदाराच्या मुलाला लागली लॉटरी

आणखी वाचा

Comments are closed.