Iran US War – अमेरिकेशी थेट चर्चा नाहीच! इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची इस्लामाबादमध्ये दाखल, रशियालाही देणार भेट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण आणि अमेरिका यांच्यातील रखडलेली चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी राजनैतिक हालचालींना वेग आला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्र अब्बास अराघची एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह शुक्रवारी पाकिस्तानमध्ये दाखल झाले आहेत. आखातातील युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थाच्या भूमिकेत आहे. या दौऱ्यात अमेरिकेसोबत थेट कोणतीही चर्चा होणार नसल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच इस्लामाबादमध्ये खलबतं झाल्यानंतर अराघची हे ओमानची राजधानी मस्कत आणि त्यानंतर रशियालाही भेट देणार आहेत, अशीही माहिती समोर आली आहे.

जवळपास दीड महिना घमासान युद्ध झाल्यानंतर इराण आणि अमेरिकेमध्ये 14 दिवसांचा युद्धविराम झाला होता. यादरम्यान पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे दोन्ही देशांमध्ये चर्चेची पहिली फेरी झाली. ही फेरी निष्फळ झाल्यानंतर आता दुसऱ्या फेरीची चर्चा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम अनिश्चित काळासाठी वाढवला. अशातच इराणचे शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये दाखल झाले असून या चर्चेत अमेरिका सहभागी होणार नसल्याचे समोर आले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बकाई यांना याबाबत माहिती दिली आहे.

अराघची यांच्या या दौऱ्यात अमेरिकेसोबत कोणतीही थेट चर्चा होणार नाही. इराण आपली भूमिका आणि मागण्या पाकिस्तानमार्फत अणेरिकेपर्यंत पोहोचवणार आहे, असे इस्माइल बकाई यांनी स्पष्ट केले. तसेच हे अमेरिकेना लादलेले युद्ध आहे, असे म्हणत त्यांनी शांततेसाठी पाकिस्तानच्या मध्यस्थीचेही स्वागत केले.

दरम्यान, शुक्रवारी अराघची यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची भेट घेतली. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इसाक दार यांनी अराघची यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचे स्वागत केले असून याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ट्रम्प यांची भूमिका स्पष्ट

दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इराण एक प्रस्ताव सादर करत असून तो काय आहे हे आधी पहावे लागेल. याचे तपशील अद्याप समोर आलेले नाहीत. परंतु कोणत्याही करारासाठी आधी इराणला आपले युरेनियम संवर्धन थांबवावे लागणार असून होर्मुझची सामुद्रधुनीतून तेलाची वाहतूक सुरळीत करावी लागेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. तसेच जोपर्यंत कोणताही अंतिम करार होत नाही तोपर्यंत अमेरिकन सैन्य नाकेबंदी कायम ठेवेल, असेही ते म्हणाले.

Comments are closed.