भारताला कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही!

पोखरण अणुचाचणीची आठवण करून देत सोमनाथच्या पवित्र भूमीवरून पंतप्रधान मोदींची गर्जना

► वृत्तसंस्था/ जामनगर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या गिर सोमनाथ येथे आयोजित सोमनाथ अमृत महोत्सवाला संबोधित केले. या ऐतिहासिक प्रसंगी त्यांनी महादेवावरील आपली दृढ श्रद्धा व्यक्त करताना सोमनाथ मंदिराच्या गौरवशाली, शाश्वत आणि अविनाशी स्वरूपाचे स्मरण केले. तसेच पोखरण येथील अणुचाचणीची आठवण करून देत अनेक बाबींवर प्रकाश टाकला. पोखरण चाचणीनंतर संपूर्ण जग भारताला दडपण्यासाठी पुढे आले. पण, ‘राष्ट्र प्रथम हा आमचा संकल्प असल्यामुळे जगातील कोणतीही शक्ती आम्हाला नमवू शकत नाही’, असा स्पष्ट संदेशही पंतप्रधानांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गुजरातच्या गिर सोमनाथ जिह्यात ‘सोमनाथ अमृत महोत्सवा’त सहभाग घेतला. भगवान शिवाला समर्पित असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नूतनीकरण केलेल्या सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाचा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी हा उत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी गुजरातच्या जनतेला संबोधित केले. सोमनाथ मंदिरात ‘अमृत पर्व’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी विविध राज्यांतील कलाकार आणि दूरदूरच्या भागांतील भाविक सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाच्या अगदी आधी सोमनाथमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो पार पडला. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि उपमुख्यमंत्री हर्ष संघवी हेही उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भव्य सोहळ्याचे वर्णन पवित्र असे केले आहे. आज प्रभास पाटनची ही पवित्र भूमी एका दिव्य तेजाने भरून गेली आहे.  महादेवाचे हे दृश्य स्वरूप, आकाशातून होणारा फुलांचा वर्षाव, कला, संगीत आणि नृत्याचे सादरीकरण, वैदिक मंत्रांचे पठण, गर्भगृहात शिवपंचाक्षरीचा अखंड जप आणि या सर्वांसोबतच सागराच्या लाटांची विजयी गर्जना, या सर्वांमुळे जणू संपूर्ण ब्रह्मांड एका जयघोषात एकवटल्याचा भास होतो असे सांगत पंतप्रधानांनी ‘जय सोमनाथ’ अशी घोषणाही दिली.

पोखरण अणुचाचणीच्या आठवणींना उजाळा

आजचा दिवस आणखी एका कारणासाठी विशेष आहे. याचदिवशी, 11 मे 1998 रोजी भारताने पोखरणमध्ये अणुचाचणी केली होती. त्यावेळी, भारताला नमवण्यासाठी जगभरातील महासत्ता पुढे आल्या होत्या. 11 मे नंतर आर्थिक निर्बंध आणि दबाव वाढला, परंतु 13 मे रोजी आणखी दोन अणुचाचण्या करून अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित सरकारने भारताची राजकीय इच्छाशक्ती अढळ असल्याचे जगाला दाखवून दिले, असे पंतप्रधानांनी सांगितले. या चाचणीवेळी भारतासाठी सर्व मार्ग बंद झाले होते. पण आम्ही घाबरलो नाही; आम्ही ठाम राहिलो. भारताने पोखरण अणुचाचणीला ‘ऑपरेशन शक्ती’ असे नाव दिले, कारण शिवासोबत शक्तीची पूजा करणे ही आमची परंपरा आहे. मी भगवान सोमनाथांच्या चरणी नतमस्तक होतो आणि ‘ऑपरेशन शक्ती’चे अभिनंदन करतो, असेही ते पुढे म्हणाले. याप्रसंगी पंतप्रधानांनी भारताला मिळालेली जागतिक ओळख आणि त्यात शास्त्रज्ञांच्या योगदानाचाही उल्लेख केला. भारताचा अभिमान असलेल्या आपल्या शास्त्रज्ञांनी संपूर्ण जगाला भारताची क्षमता दाखवून दिल्यामुळे जगभरात खळबळ उडाल्याचे ते पुढे म्हणाले.

प्रामाणिक शक्तीमुळेच पुनर्बांधणीला यश

जोपर्यंत एखादे राष्ट्र आपल्या मुळांशी जोडलेले राहत नाही, तोपर्यंत ते सामर्थ्यवान होऊ शकत नाही. भारतात वारसा आणि आधुनिकता वेगळ्या नाहीत; त्या हातात हात घालून जातात. आपल्या देशातील सांस्कृतिक आणि पवित्र स्थळांच्या पुनर्बांधणीभोवती बरेच राजकारण झाले आहे. दुर्दैवाने, आजही अशा शक्ती आहेत ज्या राष्ट्रीय अभिमानापेक्षा लांगुलचालनाला अधिक महत्त्व देतात. लुटारूंनी सोमनाथ मंदिराची भव्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मंदिर वारंवार उद्ध्वस्त झाले, पण प्रत्येकवेळी त्याची पुनर्बांधणी करण्यात आली, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

वाजपेयी सरकारच्या काळात दुसरी अणुचाचणी

11 मे 1998 रोजी, अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात भारताने आपली दुसरी अणुचाचणी केली. ही एक अत्यंत गुप्त मोहीम होती. त्याची तयारी इतकी गुप्त होती की परदेशी गुप्तचर संस्थांनाही त्याची कल्पना नव्हती. या चाचण्यांच्या माध्यमातून भारताने जगाला आपली सामरिक आणि वैज्ञानिक शक्ती दाखवून दिली. मात्र, अणुचाचण्यांनंतर अमेरिका, जपान आणि काही पाश्चात्य देशांनी भारतावर अनेक आर्थिक आणि तांत्रिक निर्बंध लादले होते.

सोमनाथच्या प्रांगणात ‘अमृत महोत्सव’

पंतप्रधान मोदींनी केला कुंभाभिषेक : 75 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचे बनले साक्षीदार

सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणी आणि उद्घाटनाच्या ऐतिहासिक 75 व्या वर्धापन दिनानिमित्त गुजरातमध्ये एका विशेष अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदींनी मंदिराला भेट देऊन पूजा केली. मंदिर ट्रस्ट आणि स्थानिक प्रशासनाने पंतप्रधानांचे भव्य स्वागत केले. त्यांनी मंदिराच्या गर्भगृहात विशेष पूजा करत भगवान शिवाचा आशीर्वाद घेतला. याप्रसंगी संपूर्ण मंदिर परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमला होता. पंतप्रधान मोदींनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या सोमनाथ मंदिरात पूजा केली. त्यांनी विशेष पूजेत भाग घेत शिवलिंगावर अभिषेक केला. मंदिराच्या 90 मीटर उंच शिखरावर करण्यात आलेला कुंभाभिषेक हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण होते. पंतप्रधानांच्या उपस्थितीत 11 पवित्र तीर्थक्षेत्रांतून आणलेल्या पाण्याने शिखराचा अभिषेक करण्यात आला. यानंतर, भारतीय संस्कृती आणि अढळ श्रद्धेचे प्रतीक असलेला ध्वजारोहण सोहळा मंदिराच्या शिखरावर विधीपूर्वक पार पडला. यावेळी मंदिराच्या परिसरात फुलांची उधळण करण्यात आली.

Comments are closed.