AIADMK सरचिटणीस पलानीस्वामी अडचणीत

निवडणूक पराभवानंतर पक्षात फूट पडण्याची चिन्हे

वृत्तसंस्था, चेन्नई

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर अण्णाद्रमुकमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तामिळनाडूत सत्तारुढ पक्ष टीव्हीकेला समर्थन देण्यावरून अण्णाद्रमुकचे आमदार गटांमध्ये विभागले गेले आहेत. याचबरोबर पक्षाचे महासचिव एडप्पादी के. पलानिस्वामी यांच्या विरोधातील सूर उमटू लागले आहेत.

अण्णाद्रमुकने एकूण 234 पैकी 167 जागांवर निवडणूक लढविली होती. परंतु पक्षाला केवळ 47 जागांवर यश मिळू शकले. या खराब कामगिरीनंतर महासचिव पलानिस्वामी यांनी आमदारांसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत. या बैठकांदरम्यान पक्षांतर्गत दोन वेगवेगळे विचार समोर आले आहेत.

पक्षात पडले दोन गट

पक्षातील एक गट टीव्हीकेला कुठल्याही प्रकारचे समर्थन देण्याला विरोध करतोय. तर दुसरा गट अभिनेता विजय यांच्या पक्षाला बाहेरून समर्थन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे पराभवाची जबाबदारी घेत पलानिस्वामी यांनी स्वत:च्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काही आमदारांनी केली आहे.  पक्षातील वाढत्या असंतोषाचे द्योतक म्हणजे सी.व्ही. षणमुगम आणि एस.पी. वेलुमणि यासारखे मातब्बर नेते आणि माजी मंत्री बैठकांमध्ये सहभागी झाले नाहती. त्यांचे समर्थक आमदारांनी देखील या बैठकांपासून अंतर राखले आहे. षणमुगम आणि वेलुमणि यांचा गट टीव्हीकेला समर्थन देण्यासाठी उत्सुक आहे.

Comments are closed.