हंताव्हायरसनंतर आता नोरोव्हायरसचा धोका, कॅरिबियन क्रूझवर १०० हून अधिक लोक आजारी

जगभरात हंताव्हायरसची भीती असतानाच आता नोरोव्हायरसने चिंता वाढवली आहे. कॅरिबियन प्रिन्सेस नावाच्या एका लक्झरी क्रूझ शिपवर नोरोव्हायरसचा प्रादुर्भाव झाला असून, यामुळे १०० हून अधिक प्रवासी आजारी पडले आहेत. यासंदर्भातील वृत्त टीव्ही९ भारतवर्षने दिले आहे.

अमेरिकेची आरोग्य संस्था सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या (CDC) माहितीनुसार, या जहाजावरील १०२ प्रवासी आणि १३ कर्मचारी अशा एकूण ११५ लोकांमध्ये संसर्गाची लक्षणे दिसून आली आहेत. या रुग्णांना प्रामुख्याने उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत आहे, जे नोरोव्हायरसचे मुख्य लक्षण मानले जाते. काही दिवसांपूर्वीच एका दुसऱ्या क्रूझवर हंताव्हायरसमुळे तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता या नवीन संसर्गामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

प्रवासादरम्यान वाढली रुग्णसंख्या

मिळालेल्या माहितीनुसार, हे जहाज २८ एप्रिल रोजी अमेरिकेच्या फ्लोरिडा येथून १३ दिवसांच्या प्रवासासाठी निघाले होते. यामध्ये ३,११६ प्रवासी आणि १,१३१ कर्मचारी स्वार होते. बहामास अरूबा आणि प्यूर्टो रिको यांसारख्या अनेक ठिकाणांहून प्रवास करत असताना ७ मे पर्यंत आजारी लोकांची संख्या मर्यादेपेक्षा जास्त झाली.

सीडीसीच्या नियमानुसार, जर जहाजावरील ३ टक्क्यांहून अधिक लोक आजारी पडले, तर त्याची सार्वजनिक माहिती देणे बंधनकारक असते. त्यानुसार क्रूझ प्रशासनाने याची माहिती आरोग्य संस्थेला दिली. प्रिन्सेस क्रूझ कंपनीने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, हा पोटाचा सौम्य विकार असून सर्व लोक एकाच वेळी आजारी पडलेले नाहीत. यातील अनेक प्रवासी आता बरेही झाले आहेत. संसर्ग रोखण्यासाठी जहाजावर स्वच्छता आणि सॅनिटायझेशन वाढवण्यात आले आहे. ११ मे रोजी जहाज पोर्ट कॅनावेरल येथे पोहोचल्यानंतर त्याचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण केले जाईल.

जहाजावरील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या जहाजावर परिस्थिती सामान्य असून क्रूझ कर्मचाऱ्यांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.

काय आहे नोरोव्हायरस?

नोरोव्हायरस हा अत्यंत वेगाने पसरणारा विषाणू असून तो प्रामुख्याने पोट आणि आतड्यांवर परिणाम करतो.

लक्षणे – उलट्या, जुलाब, पोटदुखी, मळमळ, हलका ताप आणि अंगदुखी.

प्रसार – हा विषाणू दूषित अन्न, पाणी, अस्वच्छ पृष्ठभाग आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरतो. क्रूझ शिपसारख्या बंदिस्त ठिकाणी याचा प्रसार अधिक वेगाने होतो.

Comments are closed.