आता खरी लढाई आहे ती 'बुद्धिजीवी' नक्षलवाद्यांशी!

पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल : बस्तरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी

वृत्तसंस्था/ बस्तर (छत्तीसगड)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली परंपरा कायम राखत दरवर्षीप्रमाणे यंदाची दिवाळीही देशाच्या शूर जवानांसोबत साजरी केली. छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांचा एकेकाळचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बस्तरमध्ये पोहोचून त्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांसमवेत दिवाळीचा आनंद लुटला. त्यांना मिठाईचे वाटप केले. तसेच या संवेदनशील भागात तैनात असलेल्या जवानांचे मनोबल उंचावताना पंतप्रधानांनी विरोधकांवरही निशाणा साधला. जंगलातील सशस्त्र नक्षलवाद्यांचा प्रभाव ओसरला असून आता ‘दिमागी’ नक्षलवाद्यांशी लढाई सुरू असल्याचे ते म्हणाले.

नक्षलवादाचा धोका अद्याप पूर्णपणे संपुष्टात आलेला नाही. जंगलातून सशस्त्र नक्षलवाद्यांना संपवण्यात आले आहे, परंतु आता विचारशून्य नक्षलवाद्यांचा धोका असल्याचे सुतोवाच पंतप्रधानांनी बस्तर येथे जवानांशी सुसंवाद साधताना केले. दिमागी नक्षलवादाने अनेक राजकीय संघटनांमध्ये घुसखोरी केली आहे. आपण त्यांना ओळखून संपवले पाहिजे. ते लोकांना संविधान आणि लोकशाहीविरोधात भडकवत आहेत, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी छत्तीसगडमधील बस्तर येथील कोब्रा ऑपरेशन्स बेसवर सीआरपीएफच्या जवानांसमोर हे विधान केले. पंतप्रधान दिवाळी साजरी करण्यासाठी तेथे आले होते. त्यांनी 42 मिनिटांचे भाषण दिले. दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधानांनी देशाच्या सीमावर्ती भागांना भेट देण्याची ही सलग 13 वी वेळ होती. यापूर्वी त्यांनी 12 वेळा विविध सीमावर्ती भागांना भेट दिली होती. त्यांनी जम्मू आणि काश्मीरला सर्वाधिक, तीनवेळा भेट दिली आहे. तसेच हिमाचल प्रदेश आणि लडाखला प्रत्येकी दोनदा भेट दिली आहे.

यंदाची दिवाळी देशासाठी विशेष

एकेकाळी गोळीबाराचे आवाज आणि नक्षलवादी हिंसाचाराच्या भीतीने ग्रासलेले बस्तर आता विकास आणि शांततेच्या नव्या आशेचे साक्षीदार होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. या बदललेल्या वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बस्तरमध्ये तैनात असलेल्या सुरक्षा दलांसोबत रविवारी दिवाळी साजरी केली. जवानांमध्ये वास्तव्य करून पंतप्रधानांनी त्यांच्या शौर्य, त्याग आणि समर्पणाला सलाम ठोकला. देशाचे रक्षण करण्यासाठी कार्यरत असलेले सर्व जवान त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग आहेत. देशाने नक्षलवाद आणि माओवादी दहशतवादाविरुद्धची दशकांहून अधिक काळ चाललेली लढाई जिंकल्यामुळे 2026 ची दिवाळी विशेष असल्याचे ते म्हणाले.

सैनिकांसोबतची प्रत्येक दिवाळी अविस्मरणीय

दिवाळी हा कुटुंबासोबत आनंद वाटून घेण्याचा सण असल्याचे पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले. या दिवशी लोक दूरदूरच्या प्रदेशांतून घरी परततात, परंतु देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सैनिक, आपल्या कुटुंबापासून दूर असूनही, लाखो लोकांच्या आनंदाचे रक्षण करतात. हिमालयीन प्रदेशातील कारगिल आणि लेपचापासून ते समुद्रकिनाऱ्यावरील सर क्रीक आणि समुद्रात तैनात असलेल्या आयएनएस विक्रांतपर्यंत सैनिकांसोबत साजरी केलेली प्रत्येक दिवाळी त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरली आहे. यावेळी, बस्तरच्या जंगलात सैनिकांसोबत हा सण साजरा करणे हा त्यांच्यासाठी एक विशेष अनुभव ठरला आहे.

नक्षलवादाचे निर्मूलन ही एक मोठी उपलब्धी

बस्तरमधील बदललेल्या परिस्थितीचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही तीच भूमी आहे जिथे एकेकाळी नक्षलवादी दहशतीमुळे सामान्य जीवन विस्कळीत झाले होते. संध्याकाळ होताच अनेक भाग शांत होत असत. नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे लोकांना त्यांचे लोकशाही हक्क बजावण्यापासूनही रोखले जात होते. मात्र, सुरक्षा दलांच्या शौर्याने, समर्पणाने आणि त्यागाने ही परिस्थिती बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज बस्तरमध्ये विकासाचे नवीन मार्ग खुले होत असल्याचे समाधान आपल्याला भरपूर आनंद देते, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

सर्व दलांमधील सैनिकांना सलाम

पंतप्रधानांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षेत गुंतलेल्या सीआरपीएफ, कोब्रा, बीएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, आयआरबी आणि राज्य पोलीस कर्मचाऱ्यांच्या योगदानाची प्रशंसा केली. त्यांनी बस्तर फायटर्सच्या कमांडो आणि महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या शौर्याचाही विशेष उल्लेख केला. देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या प्रत्येक सैनिकाचा देश ऋणी असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

सैनिकांच्या कुटुंबीयांच्या त्यागाचेही स्मरण

जेव्हा एखादा सैनिक देशाच्या संरक्षणासाठी घरापासून दूर असतो, तेव्हा त्याच्या कुटुंबालाही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. सैनिकांच्या जबाबदाऱ्यांमध्ये त्यांची कुटुंबेही समान भागीदार असतात. देशातील जनता ज्या सुरक्षित वातावरणात सण साजरे करतात, त्यात सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचीही मोठी भूमिका असते, असेही पंतप्रधान म्हणाले. एकंदर पंतप्रधानांनी बस्तरच्या भूमीवर सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणे हा नक्षलवादाविरुद्धचा लढा आणि या प्रदेशातील बदलत्या परिस्थितीचा संदेश पोहोचवण्याचा एक प्रसंग ठरला.

Comments are closed.