3 ऑक्टोबरची तारीख इतिहासात नोंदवली जाणार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांविरुद्ध खेळणार टीम इंडिया
भारतीय क्रिकेटसाठी (Indian cricket) शनिवार, 3 ऑक्टोबर हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. उद्या म्हणजेच शनिवारी भारतीय क्रिकेट संघ एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांविरुद्ध सामने खेळणार आहे. प्रथम जपानमध्ये भारताचा टी-20 संघ 2026 आशियाई क्रीडा (Asian Games) स्पर्धेच्या क्रिकेटच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भिडणार आहे. त्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील तिसरा आणि अखेरचा वनडे सामनाही खेळवला जाणार आहे. मात्र, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत नाही. याआधी 1998 मध्येही टीम इंडियाने एकाच दिवशी दोन सामने खेळले होते.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 12 सप्टेंबर 1998 रोजी असे घडले होते. त्यावेळी टीम इंडियाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सामना खेळला होता. त्याच दिवशी भारताने सहारा कपमध्ये पाकिस्तानविरुद्धही सामना खेळला होता. विशेष म्हणजे, भारताने हे दोन्ही सामने जिंकले होते. तब्बल 28 वर्षांनंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. आता हे पाहावं लागेल की, यावेळीही टीम इंडिया एकाच दिवशी खेळलेले दोन्ही सामने जिंकणार का?
2026 आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात होणार आहे. सुवर्णपदकासाठीचा हा सामना निशिन येथील कोरोगी स्पोर्ट्स पार्कमध्ये खेळवला जाईल. हा सामना जिंकणाऱ्या संघाला सुवर्णपदक मिळेल, तर पराभूत संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागेल. भारतीय वेळेनुसार हा सामना सकाळी 10 वाजता सुरू होईल.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यासोबतच भारतीय संघ शनिवारी वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरा वनडे सामनाही खेळणार आहे. हा सामना न्यू चंडीगडमधील मुल्लांपूर स्टेडियमवर होणार आहे. सामन्याचा नाणेफेक दुपारी 1:30 वाजता होईल, तर सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल.
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघ सध्या 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ मालिकेत क्लीन स्वीप टाळण्याचा प्रयत्न करेल, तर टीम इंडियाचे लक्ष्य मालिका 3-0 ने जिंकण्याचे असेल.
Comments are closed.