‘ओल्ड मॉन्क’च्या बाटलीवरून 7 Years Old दिशाभूल करणारा उल्लेख हटवणार, मुंबई उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर कंपनीची माघार
प्रसिद्ध रम ब्रँड ओल्ड मॉन्कच्या बाटलीवर असलेला 7 Years Old, असा दावा आता हटवण्यात येणार आहे. Bar and Bench ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई उच्च न्यायालयाने या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर, ओल्ड मॉन्कची निर्मिती करणाऱ्या कंपनीने बाटलीवरील लेबल बदलण्याची आणि दिशाभूल करणारा मजकूर हटवण्याची तयारी दर्शवली आहे.
काय आहे प्रकरण?
अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) आणि राज्य प्रशासनाने लेबलिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ओल्ड मॉन्कच्या विक्रीवर महाराष्ट्रात कारवाई केली होती. ओल्ड मॉन्कच्या बाटलीवर 7 Years Old Blended, असा ठळक उल्लेख असतो. मात्र प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, या रममध्ये ७ वर्षे जुन्या स्पिरिटचे प्रमाण अत्यंत कमी असते आणि त्यात कृत्रिम फ्लेवर्सचा वापर केलेला असतो. त्यामुळे हा दावा ग्राहकांची थेट दिशाभूल करणारा असल्याचा आक्षेप घेत FSSAI ने कारवाईचा बडगा उगारला होता.
उच्च न्यायालयाचे ताशेरे
मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने कंपनीच्या या दाव्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. जर बाटलीतील संपूर्ण मद्य खरोखरच ७ वर्षे जुने नसेल, तर त्यावर ७ इयर्स ओल्ड, असे लिहिणे ग्राहकांची फसवणूक करण्यासारखे आहे, असे न्यायालयाने सुनावले. तसेच, मद्यात मिसळलेल्या कृत्रिम फ्लेवर्सचा उल्लेख बाटलीवर इतक्या बारीक अक्षरात आहे की, तो सहजासहजी वाचता येत नाही, यावरही न्यायालयाने आक्षेप नोंदवला.
यातच महाराष्ट्रात विक्री बंद असल्यामुळे कंपनीला दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. न्यायालयाचा कठोर रोख आणि वाढता आर्थिक फटका पाहता, कंपनीच्या वकिलांनी लेबलमध्ये बदल करण्याची हमी न्यायालयाला दिली.
नव्या लेबलमध्ये काय बदल होतील?
बाटलीवरील ‘7 Years Old Blended’ हा दिशाभूल करणारा आणि वादग्रस्त मजकूर कायमचा हटवण्यात येईल.
रममध्ये कृत्रिम स्वाद मिसळले असल्याचा वैधानिक उल्लेख आता अधिक मोठ्या आणि स्पष्ट अक्षरात छापला जाईल, जेणेकरून तो ग्राहकांना सहज वाचता येईल.
कंपनी आता सुधारित आणि नवीन लेबलचा मसुदा न्यायालयासमोर अंतिम मंजुरीसाठी सादर करणार आहे. या नवीन लेबलला राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि न्यायालयाची मंजुरी मिळाल्यानंतरच, महाराष्ट्रात ओल्ड मॉन्कच्या विक्रीचा मार्ग पुन्हा मोकळा होऊ शकेल.
Comments are closed.