गप्पा मारत लिफ्टमध्ये शिरली; ओढणीने गळा दाबला, कमोडमध्ये डोकं कोंबलं, पुण्यात तरूणीकडून वृध्द

पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये चोरीच्या, किंवा घरे फोडण्याच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. मात्र, पुण्यातील म्हाळूंगे परिसरामध्ये एकट्या राहणाऱ्या वयोवृध्द महिलेची रेकी करून एका तरूणीने लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटनेतील आरोपी तरूणीने त्या वयोवृध्द महिलेची रेकी केली, त्यानंतर घरात घुसली. त्यानंतर मारहाण करत जवळ असलेलं सोनं लुटण्याचा प्रयत्न केला. वयोवृध्द महिलेच्या गळ्यात असलेलं सोन्याचं गंठण हिसकावून घेतले आणि त्यांना बाथरूममध्ये कोंडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्या वृध्द महिलेने आरडाओरडा केला. त्यानंतर शेजारी मदतीला धावून आले. त्यांनी तरुणीला पकडून ठेवले. शेजाऱ्यांनी तिला पकडल्यानंतर आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं जाणार या भीतीने तिने वृध्द महिलेचं हिसकावलेलं गंठण बॅगेतून काढून दिलं. या घटनेचा व्हिडीओ ही सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. बावधन पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार 31 जानेवारीला घडला आहे.

घटना सोशल मिडियावर व्हायरल

ही घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित तरूणी, हल्ला झालेली वृध्द महिला आणि शेजारील लोक व्हिडिओमध्ये दिसत आहेत. ती तरूणी पोलिसांच्या भीतीने मी सोनं परत देते पण, मला जाऊ द्या म्हणताना दिसते. तर वयोवृध्द महिला ही घटना नेमकी कशी घडली ती सांगते.

नेमकं काय घडलं?

म्हाळुंगे (पाडाळे) येथे दोन तरुणांच्या तात्काळ मदतीमुळे एका स्थानिक महिलेचा जीव वाचला. चोरी करणारी एक वीस वर्षाची तरुणी पोलिसांच्या स्वाधीन केली. ही तरुणी वयोवृध्द महिलेशी गप्पा मारत मारत लिफ्टमध्ये चौथ्या मजल्यावर गेली. वयोवृद्ध महिला तिच्या फ्लॅटमध्ये दार उघडून आत गेली, तोच तिच्या मागोमाग जाऊन या तरुणीने वृध्द महिलेवर जीवघेणा हल्ला केला. तिचा गळा ओढणीने आवळून गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले, अजून काय आहे सांग अशी धमकी दिली.

वयोवृध्द महिला प्रतिकार करत होती. पण, तिला ओढून बाथरूमच्या संडासच्या भांड्यात तिचे डोके कोंबले, वरून पाणी सोडले, गुदमरून महिला मारणार तेवढ्यात तिने डोकं फिरवले, मला मारू नकोस,  तुला कानातील व इतर सगळं सोनं, पैसे देते, मला सोड. वृद्ध महिलेनी कानाला कुडक्या काढण्यास हात लावण्याचा प्रयत्न करताना समोर तिच्या फ्लॅटची काचेची खिडकी तिला दिसली आणि शेवटचा प्रयत्न म्हणून तिने डायरेक्ट खिडकीवर मुसंडी मारली आणि मोठ्याने ओरडली मला वाचवा. समोर एका कुटूंबातील एक महिला गॅलरीत उभी होती, तिने मुलांना हा प्रकार सांगितला आणि हे सर्वजण काही वेळात तेथे पोहचले आणि दार तोडून महिलेला वाचवले. त्यांनी तरुणीला पकडून ठेवले. आता आपली खैर नाही हे ओळखून बॅगेतील गंठण काढून दिलं. या घटनेचा व्हिडीओ ही व्हायरल झालाय. बावधन पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार 31 जानेवारीला घडला आहे.

अधिक पाहा..

Comments are closed.