एकशे वीस मध्ये एकशे वीस.
सुवाच्य हस्ताक्षर हा एक महत्वाचा गुण मानला जात आहे. आजच्या कमी लिहिण्याच्या काळातही हस्ताक्षराला महत्व आहे. हस्ताक्षर सुवाच्य तर असावेच, पण सुवाच्यतेसमवेत लिहिण्याचा वेगही अधिक असेल तो कोणत्याही विद्यार्थ्याचे विशेष वैशिष्ट्या मानले जाते. कारण वरच्या वर्गांच्या परीक्षांमध्ये प्रश्नप्रत्रिका पूर्ण सोडविता येणे महत्वाचे ठरते. हस्ताक्षराचा वेग कमी असेल, तर कित्येकदा विद्यार्थी प्रश्नप्रत्रिका पूर्णत: सोडवत नाहीत आणि त्यामुळे अभ्यास पूर्ण असूनही सर्व आवश्यक प्रश्न न सोडविता आल्याने गुण कमी मिळण्याची शक्यता निर्माण होते आणि तसे झाल्यास विद्यार्थी स्पर्धेत मागे पडण्याचीही शक्यता निर्माण होते. झारखंड राज्याच्या एका विद्यार्थिनीने हस्ताक्षराच्या वेगासंदर्भात एक नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला आहे. डॉ. मेघा रानी असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. खरे तर त्या शालेय विद्यार्थिनी नाहीत. त्यांनी डॉक्टरेटपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.
त्यांनी नुकताच लिहिण्याच्या वेगाचा विक्रम केला आहे. त्यांनी केवळ 120 मिनिटांमध्ये 120 पाने भरतील इतका आशय हाताने हिंदी भाषेत लिहून काढला आहे. हे लेखन इतिहास आणि संस्कृती या विषयावर आधारित आहे. त्यांचे हे लेखन लवकरच ‘अपन झारखंड’ या नावाच्या पुस्तकाच्या स्वरुपात प्रसिद्ध होणार आहे. गेल्या सात वर्षांपासून त्या वेगवान लेखन करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी लेखनातील अनेक पुरस्कारही प्राप्त केले आहेत. त्यांनी ‘श्रीकृष्ण लीला’ नामक ग्रंथ लिहिला असून या ग्रंथाला ‘आंतरराष्ट्रीय विक्रम पुस्तिके’त स्थानही मिळाले आहे. या ग्रंथासह त्यांची अनेक पुस्तके आतापर्यंत प्रकाशित करण्यात आली आहेत. त्यांच्या विक्रमी वेगवान लेखनाचा प्रारंभ राजस्थानची राजधानी जयपूर येथे झाला. मे 2026 मध्ये त्यांनी पंचांच्या समक्ष ‘ऑन लाईन लाईव्ह वर्ल्ड रेकॉर्ड लेखनात भाग घेऊन हिंदी भाषेत अवघ्या 120 मिनिटांमध्ये 120 पृष्ठे भारतील एवढा आशय सलग लिहून काढला. त्यानंतर त्यांच्या या लेखनाची पंचांकडून पडताळणी करण्यात आली. सर्व निकष त्यांनी पूर्ण केल्याने आता त्यांचा नावाचा समावेश ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये केल्याची घोषणा केली गेली आहे.
Comments are closed.