भरधाव कारची दुचाकींना धडक; एक ठार, दोन गंभीर, भिवंडी उड्डाणपुलावरील घटना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भरधाव कारची दुचाकींना धडक बसून एक जण ठार आणि दोघे गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना भिवंडी शहरातील उड्डाणपुलावर आज घडली. कार सुसाट वेगात असल्यामुळे दुचाकीवरील दोघे जण पुलावरून थेट खाली फेकले गेले. यातच एकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करीत आहेत.

भिवंडीच्या दिशेने येणारी कार उड्डाणपुलावर आली असता चालकाने पुढे चाललेल्या वाहनांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यातच त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कारने समोरून येणाऱ्या तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये एक दुचाकीस्वार थेट उड्डाणपुलावरून खाली रस्त्यावर पडला. गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मुत्यू झाला. या अपघातात शाहरुख खान (३२) आणि आलम शाह (४७) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक रहिवाशांनी तातडीने भिवंडीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

या अपघातातील कारचालक हासुद्धा किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि शांतीनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे उड्डाणपुलावर काही काळ वाहतूककोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चालकाची ओळख तत्काळ पटलेली नाही.

Comments are closed.