स्पर्धा एकच, फॉरमॅट मात्र तीन! बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा अजब प्लॅन

क्रिकेटमध्ये स्थानिक पातळीवर अनेक स्पर्धा होतात. मुख्यत्वे त्या टी20 क्रिकेट प्रकारच्या असतात, मात्र बांगलादेश क्रिकेट मंडळ (BCB) एका वेगळ्याच स्पर्धेचे आयोजन करत आहेत. यामध्ये केवळ एक किंवा दोन नाही, तर तिन्ही फॉरमॅटचे सामने खेळले जातील. टी20 नंतर एकदिवसीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटचे सामने होतील.
BCB ने रविवारी (20 सप्टेंबर) या स्पर्धेच्या रचनेला मंजुरी दिली आहे. यामध्ये सहा संघ सहभागी होणार आहेत. डिसेंबर 2026 मध्ये एक टी20 स्पर्धा आयोजित केली जाईल. एकाच स्पर्धेत क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटच्या सामन्यांचे आयोजन करणारा बांगलादेश पहिलाच देश असेल.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांची मालकी BCB ने बांगलादेशातील नामांकित कॉर्पोरेट आणि वित्तीय संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे. सादर केलेल्या स्पर्धेच्या रचनेनुसार यामध्ये प्रथम श्रेणी, लिस्ट ए एकदिवसीय क्रिकेट आणि टी20 क्रिकेटचे सामने खेळले जाणार आहेत.
जाहीर केलेल्या निवेदनात BCB ने म्हटले की, मंडळाने एकाच स्पर्धा चौकटीअंतर्गत तीन फॉरमॅट – प्रथम श्रेणी (चार दिवसीय), लिस्ट ए एकदिवसीय आणि लिस्ट ए टी20 यांचा समावेश असलेली सहा संघांची देशांतर्गत स्पर्धा सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
सादर केलेल्या प्रस्तावाच्या रचनेनुसार, संघांच्या मालकीचे हक्क बांगलादेशातील नामांकित कॉर्पोरेट आणि वित्तीय संस्थांना सुरूवातीच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी दिले जाईल. याची सुरूवात टी20 क्रिकेटने होणार असून ती अंदाजे डिसेंबर 2026 मध्ये खेळले जाण्याचे नियोजन आहे, असेही त्या निवेदनात नमूद केलेले आहे.
खेळाडूंच्या मानधनातही वाढ…
आणखी एका प्रस्तावानुसार, BCB ने खेळाडूंच्या सामना शुल्कातही वाढ केली आहे. सुधारित रचनेनुसार, पुरुष क्रिकेटपटूंना प्रत्येक चार दिवसीय सामन्यांसाठी 1.5 लाख टाका, प्रत्येक लिस्ट ए सामन्यासाठी एक लाख टाका आणि प्रत्येक टी20 सामन्यासाठी 80,000 टाका मिळतीत.
महिला क्रिकेटपटूंच्याही सामना शुल्कामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तीन दिवसीय क्रिकेटसाठी 40,000 टाका, एकदिवसीयसाठी 30,000 टाका आणि टी20 क्रिकेटसाठी 20,000 टाका करण्यात आले आहे.
Comments are closed.