विरोधी पक्षांचे नेते राष्ट्रपतींशी चर्चा करतात.

मतचोरी, ‘एसआयआर’सह विविध मुद्यांवर मांडली भूमिका

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

मतचोरीचे आरोप आणि मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनर्परीक्षणावरून (एसआयआर) विरोधी पक्षांची निदर्शने सुरूच आहेत. यासंदर्भात विरोधी पक्षांचे खासदार शुक्रवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जमले होते. त्यानंतर त्यांनी विजय चौकाकडे मोर्चा काढत धरणे आंदोलन केले. दरम्यान, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील 10 विरोधी नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपतींच्या भेटीसाठी या विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळासाठी शुक्रवारी रात्री 8 वाजता ची वेळ निर्धारित करण्यात आली होती.

राष्ट्रपतींना भेटलेल्या शिष्टमंडळात राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी,  सीपीआय(एम)चे एम. ए. बेबी, डी. राजा, सपा खासदार राजीव राय, सुप्रिया सुळे, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि आरजेडी खासदार मनोज झा यांचा समावेश होता. शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीला पोहोचले असताना इतर विरोधी पक्षनेते आणि खासदारांनी विजय चौकात धरणे आंदोलन सुरू ठेवले होते.

राष्ट्रपतींसोबतच्या बैठकीनंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आम्ही सर्वांनी राष्ट्रपतींसमोर आमची मते मांडली आणि मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला. फेरनिवडणुका घ्याव्यात अशी आमची मागणी आहे. ईव्हीएमच्या जागी मतपत्रिका वापराव्यात अशीही आमची मागणी आहे, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

राष्ट्रपतींनी आमच्याकडे पुरावे मागितले आहेत. आम्ही त्यांना मतचोरीच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून आमची बाजू ऐकून घेतली आहे. आम्ही राष्ट्रपतींना संविधानाचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे. आता, आम्ही मतचोरीशी संबंधित पुरावे राष्ट्रपतींना सादर करू, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधक आक्रमक

‘एसआयआर’दरम्यान पारदर्शकता न राखल्याने अनेक मतदारांची नावे जबरदस्तीने वगळण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. विरोधी पक्ष मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची आणि संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत आहेत. तथापि, निवडणूक आयोग आणि भाजपने विरोधी पक्षांचे आरोप फेटाळून लावले आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी खासदार गेल्या तीन दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करत आहेत. आपले आंदोलन अधिक तीव्र करत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी गुरुवारी महात्मा गांधींच्या राजघाट येथील स्मारकासमोर ठिय्या आंदोलन केले. मुख्य निवडणूक आयुक्त आणि मतचोरीच्या आरोपांविरोधात विरोधी पक्षनेत्यांच्या आंदोलनाचा हा सलग तिसरा दिवस होता.

Comments are closed.