बदनाम करू नका म्हणणाऱ्यांनीच विधिमंडळाच्या परंपरेला बदनाम केले, विरोधकांचा सरकारवर जोरदार हल्ला, पावसाळी अधिवेशन फक्त पुरवणी मागण्या मंजूर करण्यासाठीच
महाराष्ट्राला बदनाम करू नका असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेच जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची उत्तरे न देऊन विधिमंडळाच्या पवित्र परंपरेला बदनाम केले आहे, असा हल्ला आज विरोधी पक्षातील महाविकास आघाडीने केला. जनतेच्या प्रश्नांसाठी नाही तर केवळ पुरवणी मागण्या मंजूर करण्यासाठीच सरकारने अधिवेशन बोलवले आणि पाशवी बहुमताच्या जोरावर वैयक्तिक स्वार्थ साधून घेतला, असा आरोपही विरोधी पक्षाने केला.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झाले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधान भवनातील मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर कक्षात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी शिवसेना गटनेते भास्कर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील, काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी अधिवेशनातील महायुती सरकारच्या मनमानीवर बोट ठेवले. याप्रसंगी काँग्रेस आमदार नितीन राऊत आणि विधान परिषदेतील शिवसेना आमदार अंबादास दानवे उपस्थित होते.
राम मंदिराचे 1400 कोटी चोरणारे निर्ढावलेले सरकार – भास्कर जाधव
महाविकास आघाडीने विरोधी पक्षाचे कर्तव्य पुरेपूर पार पाडत जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. पण राम मंदिराचे 1400 कोटी रुपये चोरणारे महायुती सरकार निर्ढावलेले ठरले, अशी टीका शिवसेना गटनेते भास्कर जाधव यांनी केली. अतिवृष्टीबाबतचा महत्त्वाचा प्रस्ताव विरोधी पक्षाने मांडला. परंतु त्यावर उत्तर द्यायला एकही पॅबिनेट मंत्री सभागृहात हजर राहिला नाही हे दुर्दैव आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. सरकारला फक्त 97 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मान्य करण्यातच स्वारस्य दिसले. पॅबिनेट मंत्र्यांऐवजी दुसरेच मंत्री उत्तर देत होते, असे भास्कर जाधव म्हणाले.
सरकारचा नाकर्तेपणा दिसून आला – जयंत पाटील
पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी विविध विषय मांडले. स्मार्ट मीटर अन्यायकारक आहे हे प्रकटपणे सांगितले. राज्यात ड्रग्जचा प्रभाव वाढलेला आहे. पोलीस आणि ड्रग माफियांचे नेक्सस व हप्तेखोरी वाढली. राज्यातील देवस्थानांच्या जमिनीत भ्रष्टाचार झाला आहे. बीड व सांगलीतील देवस्थानांच्या जमिनी लाटल्या गेल्या. ते मुद्दे विरोधी पक्षाने मांडले, परंतु सरकार त्याबाबत समाधानकारक उत्तरे देऊ शकली नाही. मुंबई, ठाणे व कोकणातील पावसामुळे झालेल्या दुर्घटनेवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. मात्र सरकारने अनेक मुद्द्यांना बगल दिली. अनेक उत्तरे टाळली. सरकारचा नाकर्तेपणाच अधिवेशनात समोर आला, असे जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्र दिवाळखोरीत गेला आहे – नाना पटोले
महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्र दिवाळखोरीत गेला आहे, अशी टीका काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केली. राज्यातील जनता आणि शेतकऱ्यांचा या सरकारवर विश्वास राहिलेला नाही. कर्जमाफीबाबत केवळ मलमपट्टी लावण्याचा आज मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अटी काढू, असे ते म्हणाले. पण लबाडाघरचे जेवण जेवल्याशिवाय पूर्ण होत नाही अशी परिस्थिती आहे, असे पटोले म्हणाले.
Comments are closed.