दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
सातारा क्राईम न्यूज : निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी सातारा जिल्ह्यातील (Satara) महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी परिसरात आलेल्या एका पर्यटकाचा (Tourist) अतिशय दुर्दैवी अंत झाला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथे घरात डोकावल्याच्या संशयावरून भिगवण येथील अक्षय रमेश जाधव या 24 वर्षीय युवकाची लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी चिखलात तुडवून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाचगणी पोलिसांनी (Panchgani Police) मुख्य संशयित आरोपीसह वाई परिसरातील चार जणांना अटक (Arrested) केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भिगवण येथील अक्षय जाधव हा आपल्या मित्रांसोबत पाचगणी परिसरात फिरण्यासाठी आला होता. भोसे येथील एका लॉजवर ते मुक्कामास होते. दरम्यान, अक्षय हा प्रचंड दारूच्या नशेत असल्यामुळे मित्रांनी सुरक्षेचा उपाय म्हणून त्याला राहत्या खोलीत कोंडून ठेवले होते. मात्र, काही वेळाने अक्षयने खोलीचा दरवाजा उघडून बाहेर धाव घेतली. नशेत असतानाच त्याने शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाच्या घरात डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला.
Satara Crime News: पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं
आपल्या घरात अनोळखी व्यक्ती डोकावत असल्याचे पाहून संबंधित मुलीचे वडील आणि त्यांचे साथीदार संतप्त झाले. त्यांनी अक्षयला पकडून कोणतीही शहानिशा न करता थेट जीवघेणी मारहाण करण्यास सुरुवात केली. लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी त्याला चिखलात पाडून बेदम तुडवण्यात आले. या अमानुष मारहाणीत अक्षय गंभीर जखमी झाला. मारहाणीची माहिती मिळताच मित्रांनी त्याला तातडीने उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात हलवले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Satara Crime News: मुख्य संशयितासह चौघे गजाआड
या घटनेमुळे पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरातील पर्यटन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पाचगणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सूर्यकांत गोळे याच्यासह वाई परिसरातील त्याच्या इतर तीन साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एका संशयावरून कायदा हातात घेऊन पर्यटकाची हत्या करणाऱ्या या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
Comments are closed.