क्ले पासून दागिने

आभूषणे किंवा दागिन्यांच्या निर्मितीसाठी महागड्या धातूंची आवश्यकता असते, अशी आपली समजूत आहे. सोने आणि चांदी यांची आभूषणे तर प्रसिद्ध आहेतच. इतर धातूंचाही यासाठी उपयोग केला जातो. पण मातीपासून आभूषणे निर्माण करता येतात यावर आपल्यापैकी बहुतेकांचा विश्वास बसणे कठीण आहे. हाच चमत्कार मध्यप्रदेश राज्यातील हरीश धवन या कलाकारांनी करुन दाखविला आहे. त्यांनी विशिष्ट प्रकारच्या मातीपासून बनविलेली आभूषणे सध्या चर्चेचा विषय बनली आहेत. ही आभूषणे रंगविण्यासाठी ते पालक, कोथिंबीर, पक्ष्यांची विष्ठा किंवा स्पर्म यांचा उपयोग करतात. त्यांची ही कला अद्भूत अशीच आहे. त्यांनी निर्माण केलेली आभूषणे पाहण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी बरेच लोक येतात. त्यांच्या या कौशल्याचे अनेकांना आश्चर्य वाटते. ही आभूषणे पाहिली, तर ती मातीपासून निर्माण केलेली आहेत, यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. ही आभूषणे महागडी काच, नैसर्गिक मोती आणि तत्सम महागड्या वस्तूंपासून निर्माण केल्यासारखी दिसतात. माती, भाज्या, पक्षांची विष्ठा आणि वीर्य (स्पर्म) अशा वस्तूंपासून अतिसुंदर आभूषणे निर्माण करणारे हे भारतातील प्रथमच कारागिर असावेत, असे त्यांच्यासंबंधी बोलले जाते. हे काम अर्थातच अत्यंत जटील आहे.

आभूषणे निर्माण करण्यासाठी मातीवर विशिष्ट प्रक्रिया करुन ती आभूषणांसाठी योग्य करुन घ्यावी लागते. यासाठी आठ महिन्यांचा कालावधी लागतो. धवन मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर भागात वास्तव्यास आहेत. या भागात पूर्वापारपासून असणारे वनवासी अशा प्रकारची मातीची आभूषणे निर्माण करतात. त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन धवन यांनी हे शास्त्र विकसीत केले आहे. वनवासींच्या निर्मितीपेक्षा काहीशा भिन्न प्रकारे ते हे काम करतात. तथापि, ही कला पुरातन आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. ही माती विशेष प्रकारची असते आणि ती याच भागात उपलब्ध आहे. माती आणण्यापासून आभूषणे निर्माण करण्यापर्यंतचे सर्व काम ते एकटेच स्वत: करतात. त्यांचा कोणीही साहाय्यक नाही.

Comments are closed.