सांगलीत कृष्णामाई नदीपात्रात मृत कोंबड्या फेकल्या, प्रशासनाच्या कारवाईवर गंभीर प्रश्न

कृष्णा नदीमध्ये पोत्यात बांधून मृत कुत्रा टाकल्याच्या गंभीर घटनेनंतरही अद्याप गुन्हा दाखल करण्याचे सौजन्य सांगली महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने दाखवलेले नाही. प्रशासनाकडून ठोस कारवाईची अपेक्षा असतानाच, सोमवारी (दि. 27) पुन्हा एकदा कृष्णामाई नदीमध्ये मृत कोंबडय़ा फेकण्यात आल्याच्या घटनेने संताप व्यक्त होत आहे.

नदी किनारी असलेली भटकी कुत्री पाण्यात उतरून हे मृत अवशेष खातात. त्यामुळे नदीचे प्रदूषण, जैविक कचऱ्याचा प्रश्न आणि नागरिकांच्या आरोग्याचा धोका अधिक गंभीर झाला आहे.

नदी प्रदूषण करणारे घटक प्रशासनाच्या निक्रियतेचा गैरफायदा घेत आहेत का? वारंवार मृत प्राणी व जैविक कचरा नदीमध्ये फेकला जात असताना संबंधित व्यक्तींवर कारवाई होत नसेल, तर हे नदी प्रदूषण करणाऱयांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देण्यासारखे आहे. महापालिका, पोलीस प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणेने या प्रकाराची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कृष्णामाई नदी ही कचरा टाकण्याची जागा नाही. मृत प्राणी, कोंबडय़ा-मटणाची घाण, पिसे आणि इतर जैविक कचरा नदीमध्ये टाकणऱयांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, महापालिका प्रशासनाची अवस्था ‘आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय’, अशी झाली आहे. आता आश्वासनापेक्षा थेट कारवाई झाली तरच अशा घटनांना आळा बसेल, अशी भावना सांगलीकर जनतेमधून व्यक्त होत आहे.

जनआंदोलन उभारण्याचा इशारा

महानगरपालिका आयुक्त, महापौर, पोलीस प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण विभागाने तातडीने गुन्हा नोंदवून दोषी व्यक्तींचा शोध घ्यावा, सीसीटीव्हीचे फुटेज तपासावेत आणि कृष्णामाई नदीमध्ये जैविक कचरा टाकण्याच्या घटनांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. येत्या दोन दिवसांत ठोस कारवाई झाली नाही, तर या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कायदेशीर व लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि प्रशासनाच्या निक्रियतेविरोधात व्यापक जन आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा सामाजिक संघटनांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

Comments are closed.