मुंबईत 900 आंदोलकांवर गुन्हे

दिल्लीतील जेन झी लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी विद्यार्थी आणि तरुणांचे उत्स्फूर्तपणे आंदोलन सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क, चैत्यभूमी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून हजारो विद्यार्थी ठाण मांडून निदर्शने करत आहेत. हे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी दंडुका उगारला असून 900हून अधिक आंदोलकांवर मुंबईतील आठ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सोनम वांगचुक आणि कॉक्रोज पार्टीच्या समर्थनार्थ सोमवारी चैत्यभूमी येथे आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार शेकडो विद्यार्थी सकाळपासूनच चैत्यभूमीच्या दिशेने निघाले होते. पण या आंदोलनाचा धसका घेतलेल्या सरकारने दादर, शिवाजी पार्क, माहीम, वरळी, शीव, वडाळा टीटी परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवून आंदोलनाला येणाऱया विद्यार्थ्यांना उचलून फरफटत नेले होते. प्रत्येकाला वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. त्यानंतर रात्री उशिरा विविध पोलीस ठाण्यात 900 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

शिवाजी पार्क-300 जणांवर गुन्हा, माहीम पोलीस ठाण्यात 100हून अधिक, दादर पोलीस ठाण्यात 70हून अधिक, भोईवाडा-20, काळाचौकी-21, वडाळा टीटी-25हून अधिक आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे. पोलिसांकडून अधिकृत आकडे देण्यात आलेले नाहीत. मात्र हा आकडा 900हून अधिक असल्याचे कळते.

उच्च न्यायालयात गुन्हे मागे घेण्यासाठी जाणार

सरकारने विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करून अन्याय केला आहे. ना घोषणाबाजी, ना फलक झळकवले, ना एकत्र जमून निषेध नोंदवला. तरी 900 जणांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले.  हा आम्हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. जबरदस्तीने आमच्यावर हे गुन्हे लादले असून ते गुन्हे रद्द करावे याकरिता आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे साम्या कोरडे यांनी सांगितले.

पोलिसांकडून धडाधड नोटिसा

आंदोलकांना शिवाजी पार्क, माहीम, वरळी पोलीस ठाण्यातून नोटिसा पाठवण्यात आल्या. त्यात मंगळवारी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. चौकशीला हजर राहिला नाहीत तर तुम्हाला काहीही सांगायचे नाही, असे समजून पुढील कारवाई केली जाईल, असे या नोटिशीत बजावण्यात आले आहे.

Comments are closed.