रुग्णालये, पालिका कार्यालयांत गुटखा-तंबाखू सेवन करणाऱ्यांना प्रवेशबंदी
महापालिकेचे मुख्यालय, विभागीय प्रशासकीय कार्यालय व दवाखाने रुग्णालयात स्वच्छता राखण्यासाठी गुटखा, तंबाखू व पानाचे सेवन करणाऱ्यांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय पालिका प्रशासन घेणार आहे. या नियमांनुसार, गुटखा किंवा तंबाखूचे सेवन करून येणाऱ्या व्यक्तींची प्रवेशद्वारांवर सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून तपासणी केली जाणार आहे.
महापालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी यासंदर्भात सभागृहात ठरावाची सूचना मांडली होती. त्यावर चर्चा करताना सदस्यांनी रुग्णालयांचा परिसर व पालिका कार्यालये अस्वच्छ होत असल्याकडे लक्ष वेधले. रुग्णालय व शाळा परिसरात गुटखा, सिगरेट व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी असतानाही मुंबईत अनेक ठिकाणी त्याची विक्री होते. यावर कारवाईची मागणी नगरसेवकांनी केली. तसेच ही ठरावाची सूचना याआधीही आली होती. ती मंजूर झाल्यानंतरही गुटखा बंदी निर्णयाची अंमलबजावणी का होत नाही, याबाबतही प्रशासनाला जाब विचारण्यात आला.
महापौर रितू तावडे यांनी रुग्णालयात स्वच्छता राखण्यासाठी एक रुग्ण, एक नातेवाईक किंवा नातेवाईकांना व्हिजिटिंग कार्ड देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती देत पालिका मुख्यालय, विभागीय कार्यालय व रुग्णालयात तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्या व्यक्तींना प्रवेशबंदी करण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर केला.
प्रशासनाने या सूचनेची दखल घेतली असून आरोग्य विभागाकडून नवीन नियमावली तयार केली जाणार आहे. नव्या नियमांनुसार, रुग्णालयांच्या प्रवेशद्वारांवर सुरक्षा रक्षक येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची तपासणी केली जाईल.
Comments are closed.