पीसीबीच्या शाही डिनरमध्ये खेळाडूंची झाडाझडती
पाकिस्तानचा संघ सध्या पुन्हा एकदा आपल्या अजब कारभारामुळे तोंडघशी पडला आहे. निमित्त ठरलं ते पीसीबीचे सर्वेसर्वा मोहसीन नक्वी यांनी खेळाडूंसाठी आयोजित केलेलं ‘शाही डिनर’चं. पाकिस्तानात क्रिकेटपटूंना कशी शाळकरी पोरांसारखी वागणूक दिली जाते याचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेच्या तोंडावर पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या स्वागतासाठी खेळाडूंची रांग लागली होती. याच रांगेत डोक्यावर कॅप घालून आलेला हसन नवाज हा नक्वी यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी पुढे सरसावला. त्याच्या मागेच स्टार गोलंदाज नसीम शाहही टोपी घालून उभा होता. हे पाहताच नक्वी यांच्या शेजारी उभ्या असलेल्या टीम मॅनेजरने खूण करत दोघांना टोपी काढण्याचे संकेत दिले. हसन नवाज आणि नसीम शाह या दोघांनीही तातडीने डोक्यावरची कॅप काढली, ती हातात धरली आणि मान खाली घालून ते पुढे निघाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना अशा प्रकारे वागवल्याने क्रिकेट विश्वात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
व्यवस्थापक अर्थातच शिस्तीसाठी जबाबदार असतात, पण राष्ट्रीय क्रिकेटपटू हे शाळकरी मुले नाहीत ज्यांना एखाद्या कार्यक्रमादरम्यान त्यांच्या टोप्या काढायला बोटाच्या इशाऱ्याने सांगावे. कार्यक्रमापूर्वी खेळाडूंना अशा प्रोटोकॉलची माहिती दिली जाते, नाही का? आशा आहे की कोणीही ही वैयक्तिक टीका म्हणून घेणार नाही https://t.co/zcY9dsmPaE
– सोहेल इम्रान (@sohailimrangeo) 8 ऑक्टोबर 2026
Comments are closed.