पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वामध्ये नमाजादरम्यान आत्मघाती स्फोट; १५ जणांचा मृत्यू, मशिदीचे मोठे नुकसान
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामधील कोहाट येथे शुक्रवारच्या नमाजादरम्यान ओल्ड पोलीस लाइन्सजवळ एक शक्तिशाली आत्मघाती स्फोट झाला. यात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.तसेच मशीदीचेही मोठे नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटकांनी भरलेले एक वाहन ओल्ड पोलीस लाइन्सच्या गेटला धडकल्याने स्फोट झाला. या स्फोटामुळे मशिदीबाहेर एक खड्डा पडला, मशिदीच्या बाह्य भागाचे नुकसान झाले आणि एक भिंत कोसळली. जवळच्या इमारतींचेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, २५ जखमींना कोहाटच्या डीएचक्यू रुग्णालयात आणण्यात आले. जखमींमध्ये पोलिसांचाही समावेश होता. रेस्क्यू ११२२ ची पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी जखमींना रुग्णालयात नेण्यास सुरुवात केली.
पोलीस आणि सुरक्षा दलांनी ओल्ड पोलीस लाइन्सला वेढा घातला असून शोध आणि बचाव मोहीम सुरू होती. कोहाट-हांगू रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचे वृत्त आहे. परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
अधिकारी स्फोटाच्या परिस्थितीचा आणि जबाबदार व्यक्तींच्या ओळखीचा तपास करत होते. स्फोटानंतर गोळीबार झाल्याचेही वृत्त आहे. मृतांची निश्चित संख्या आणि हल्ल्याचे स्वरूप याबाबत नेमकी माहिती मिळालेली नाही. या हल्ल्याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
Comments are closed.