पाणी वाटपाच्या मुद्द्यावर पाकिस्तानने नरमली भूमिका घेतली आहे

भारताशी चर्चा करण्यास सज्ज असल्याचे प्रतिपादन

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

सिंधू नदी पाणीवाटप करारासंदर्भात आता पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत या संदर्भात आक्रमक भाषा करणारा पाकिस्तान आता चर्चेची भाषा करु लागला आहे. या प्रश्नी संघर्ष न करता भारताशी चर्चा करुन तोडगा काढण्यास आम्ही सज्ज आहोत, असे त्याचे म्हणणे आहे. भारताने मात्र, या प्रश्न आपली ठाम भूमिका सोडण्यास नकार दिला आहे. पहलगाम येथे पाकिस्तानने क्रूर दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारताने ‘सिंदूर’ अभियानाच्या माध्यमातून पाकिस्तानचे कंबरडे मोडले. ही कारवाई करण्याआधी भारताने अनेक दशकांपूर्वी पाकिस्तानशी करण्यात आलेला सिंधू जलवितरण करार स्थगित केला.

तसेच भारतातून पाकिस्तानात वाहणाऱ्या नद्यांचे पाणी भारतासाठी उपयोगात आणण्याच्या अनेक नव्या योजना घोषित करुन त्या लागू केल्या. त्यामुळे पाकिस्तातून वाहणाऱ्या सिंधू नदीचे पाणी कमी होण्यास प्रारंभ झाला आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सिंधू नदीच्या पाण्यावरच अवलंबून आहे. या पाण्याचे प्रमाण कमी झाले, तर तेथे अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊ शकते. तसेच आद्योगिक उत्पादनावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा करार चालू रहावा अशी पाकिस्तानची इच्छा आहे. मात्र, भारताचा निर्धार दृढ दिसून येतो.

हेगच्या न्यायालयाचा निर्णय

हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानने हे प्रकरण नेले होते. न्यायालयाने भारताला हा करार पुनर्जिवीत करण्याचे आवाहन केले. भारत एकतर्फी हा करार स्थगित करु शकत नाही, असा निर्णय या न्यायालयाने दिला. तथापि, या न्यायालयाला असा निर्णय देण्याचा अधिकारच नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे. पाकिस्तान जो पर्यंत दहशतवाद सोडत नाही, तो पर्यंत या करारासंबंधी त्याच्याशी चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, ही भारताची भूमिका आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतरही भारताने दबावाखाली येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्ताची चांगलीच गोची झाल्याचे दिसते.

चर्चेची तयारी

भारताचा निर्धार पाहून पाकिस्तानने एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. आक्रमक भाषा किंवा भारताला युद्धाची धमकी देण्याने परिणाम होणार नाही, हे त्या देशाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता भारताशी चर्चा करुन प्रश्न सोडविण्यास आम्ही सज्ज आहोत. भारतानेही चर्चा प्रक्रियेत भाग घ्यावा, असे आवाहन पाकिस्तानकडून बुधवारी करण्यात आल्याची माहिती आहे.

Comments are closed.