कुणी पाणी देता का पाणी? डबक्यातील गढूळ पाण्यावर आदिवासी बांधवांना तहान भागवण्याची वेळ

पालघर : एकीकडे शासनाच्या जल जीवन मिशनच्या मोठमोठ्या घोषणा सुरू आहेत. जल जीवन मिशनमुळे घरोघरी स्वच्छ आणि मुलबक पाणी (Water) पुरवले जात असल्याचा दावा शासन करते. त्यासाठी, लाखोंच्या जाहिरातीही दिल्या जातात. केवळ काही प्रमाणात झालेल्या कामाची टिमकी वाजवण्याचं काम सुरू आहे. मात्र, दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आजही आदिवासी कातकरी बांधवांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. विवळवेढे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कातकरीपाड्यावर ग्रामस्थांना जनावरं ज्या डबक्यातून पाणी पितात, त्याच डबक्यातून दूषित पाणी भरून आणावं लागत आहे. विशेष म्हणजे, भर उन्हाळ्यात (summer) तळपत्या उन्हात लहान लेकरांसह गढूळ पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र महालक्ष्मी मंदिर असलेल्या विवळवेढे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कातकरीपाड्यावर आजही पाण्याचा गंभीर प्रश्न कायम आहे. तब्बल 250 ते 300 लोकवस्ती असलेल्या या पाड्यात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कोणतीही शाश्वत व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. महिला, वृद्ध आणि लहान मुलांना रात्रीच्या अंधारात जवळपास एक किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन पाणी आणावे लागते. धक्कादायक बाब म्हणजे ज्या डबक्यातून ग्रामस्थ पाणी भरतात, त्याच डबक्यात जनावरे देखील पाणी पित असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

ग्रामस्थांच्या मते, अनेकवेळा ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करूनही केवळ आश्वासनांची खैरात करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. हीच परिस्थिती स्थानिक रहिवाशांकडून जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी

मूलभूत सुविधांपासून ग्रामस्था वंचित

वाढत्या उन्हामुळे दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढला असून, तात्काळ कायमस्वरूपी पाणीपुरवठा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आदिवासी कातकरी समाजाला आजही मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे हे वास्तव प्रशासनाच्या विकासाच्या दाव्यांना प्रश्न विचारणारे आहे. आता तरी प्रशासन जागे होऊन या पाड्यावरील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा

पिण्याच्या पाण्यासाठी एक किलोमीटर पायपीट
जनावरांसोबतच डबक्यातील पाणी पिण्याची वेळ
ग्रामपंचायत आणि प्रशासनाविरोधात संताप
जल जीवन मिशनच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह
तात्काळ पाणीपुरवठ्याची मागणी
आंदोलनाचा इशारा

हेही वाचा

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना विजय प्रोटोकॉल विसरले, आक्रमकही झाले; राज्यपालांनी थांबवलं, काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.