Pandharpur Kartiki Ekadashi 2026 – कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरीत 5 लाख भाविक दाखल, राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा वारीला फटका
‘अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर’ अशा संतोक्तीची प्रचिती देत असलेला तीर्थक्षेत्र पंढरपूरचा कार्तिकी एकादशीचा सोहळा लाखो वैष्णवांच्या उपस्थित भक्तीमय वातावरणात साजरा होत आहे. एकादशी सोहळ्यासाठी पंढरीत 5 लाख भाविक दाखल झाले आहेत. यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने याचा फटका कार्तिकी वारीला बसला आहे. यामुळे भाविकांची संख्या घटली असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा पहाटे 2.20 वाजता करण्यात येणार आहे.
पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेकरीता एसटी, रेल्वे, खासगी वाहनांची तसेच दिंड्यांबरोबर लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. दशमी दिवशी चंद्रभागा वाळवंट, 65 एकर, मंदिर परिसर, स्टेशन रोड, भक्तीमार्ग, प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी फुलून गेला आहे. दर्शन रांग मंदिरापासून पत्राशेडच्या बाहेर गोपाळपूर रस्त्यावर दशमी दिवशी गेली आहे. मंदिरापासून सुमारे 4 किमी अंतरावर दर्शन रांग पोहोचली आहे. दर्शन रांगेत 1 लाखाहून अधिक भाविक दाखल झालेले आहेत. तर 65 एकर भक्तीसागरात 3 लाख भाविक वास्तव्य करत आहेत. येथील तूंब, राहुट्यांमध्ये भजन, किर्तन व प्रवचनात भाविक दंग झाले आहेत.
यंदा चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप, रब्बी हंगाम वाया गेले. त्यामुळे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. याचा परिणाम कार्तिकी यात्रेला भाविकांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी आहे. त्यामुळे दर्शन रांग गोपाळपूरपर्यंतच पोहोचली आहे. दर्शन रांगेतील भाविकांना पदस्पर्श दर्शनासाठी किमान 10 ते 12 तासांचा कालावधी लगात आहे. एका मिनीटाला साधारणपणे 35 ते 40 भाविकांना पदस्पर्श दर्शन मिळत आहे. तर मुख दर्शन रांगही मंदिरापासून विठ्ठल अन्नक्षेत्रापासून पुढे संभाजी महाराज पुतळा ते काळा मारुतीपर्यंत पुढे सरकली आहे. मुख दर्शनासाठी देखील किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागत आहे. भाविकांच्या उपस्थितीने शहरातील व उपनगरातील मठ, मंदिर, भक्त निवास हाऊस फुल्ल झाली असून भाविक भजन, किर्तन करण्यात दंग असल्याचे चित्र दिसून येत आहे.
चंद्रभागेत मुबलक पाणी असल्यामुळे भाविकांना स्नान करता येत आहे. तर या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून जीवरक्षक दलाच्या स्पीड बोटी तैनात करण्यात आलेल्या आहेत. 4 हजार 656 पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. तर 335 हून अधिक सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर भाविकांवर असणार आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांमध्ये उत्साह, नवचैतन्य संचारल्याचे दिसून येत आहे.
Comments are closed.