Pandharpur News – वारीच्या नियोजनात VIP दौऱ्याचा व्यत्यय, अधिकाऱ्यांसह सामान्य वारकऱ्यांची दमछाक
येत्या 25 जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्याच्या नियोजनासाठी सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा डोळ्यात तेल घालून कामाला लागलीय. वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही कसूर राहू नये यासाठी शासकीय यंत्रणा सूक्ष्म नियोजन करीतअसताना, गेल्या तीनचार दिवसांपासून मंत्री, आमदार, खासदार आणि नेते मंडळींचे पंढरपूर दौरे वाढले आहेत. पाहणी दौरे, आढावा बैठका, देवदर्शन आदी सरबराईत वारी नियोजनाचे बारा वाजतात की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.
आषाढी सोहळ्यासाठी फक्त वीस दिवस बाकी आहेत. सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रासह, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्यातून शेकडो दिंड्या आणि पालख्यांनी पंढरीची वाट धरली आहे. वीस लाखांहून अधिक वारकरी भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज असून बांधून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शासकीय यंत्रणेला सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी, पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगोटे, मुख्याधिकारी महेश रोकडे आदी मंडळी जोमाने कामाला लागली आहेत.
वारीच्या नियोजनात कसलीही कसूर राहू नये यासाठी पालकमंत्री व स्थानिक यंत्रणा विशेष दक्षता घेत असताना, अन्य खात्याचे मंत्रीगण, मंत्रालयातील अधिकारी, राज्यभरातील आमदार, खासदार, राजकीय नेते आदी व्हीआयपी मंडळींचे पंढरपूर दौरे अचानक वाढले आहेत. वारकऱ्यांचा आम्हाला किती कळवळा आहे हे दाखविण्यासाठी ही मंडळी जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेला दिवसभर गर्र गर्र फिरवून त्यांचा वेळ वाया घालवीत आहेत.
स्थानिक अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांना सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी वेळ द्यायचा का चमको व्हीआयपींची सरबराई करण्यासाठी वेळ द्यायचा अशी द्विधा परिस्थिती शासकीय यंत्रणे समोर निर्माण झालीय. पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वाखाली वारीचे नियोजन केले जात असताना महायुतीतील अन्य मंडळी या नियोजनात हस्तक्षेप करीत असल्याने, नेमके कोणाचे ऐकायचे, असा संभ्रम निर्माण होतोय.
रात्र थोडी आणि सोंग जास्त अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. वारीसाठी वीस दिवसांचा अवधी आहे, या अल्प कालावधीत वारकऱ्यांना मूलभूत सेवा सुविधा पुरविण्याचे कौशल्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्हीआयपीच्या दौऱ्यांना आवर घालण्याची आवश्यकता आहे.
दर्शन रांगेतील भाविक त्रस्त…
दरम्यान, श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी व्हीआयपी भाविकांची वर्दळ वाढू लागल्याने, दर्शन रांगेत अनेक तास तिष्ठत उभा राहणाऱ्या वयोवृद्ध भाविकांच्या त्रासात वाढ होते आहे. व्हीआयपी दर्शन बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असले तरी व्हीआयपी दर्शन आणि त्यांचे देवाजवळील फोटो सेशन आजही सुरुच आहे. यावर कडक निर्बंध आणणे गरजेचे आहे.
Comments are closed.