Ratnagiri News – मंडणगडात धुव्वाधार! पन्हळी खुर्द पुलावरून पाणी वाहिल्याने गावाचा संपर्क तुटला
मंडणगड तालुक्यात शुक्रवारपासून सुरू असलेल्या धुव्वाधार पावसामुळे सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली असून, म्हाप्रल-पन्हळी खुर्द मार्गावरील पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने पन्हळी खुर्द गावाचा संपर्क काही काळ पूर्णपणे तुटला होता.
पन्हळी खुर्द गावाच्या हद्दीत नदीवर असलेल्या छोट्या पुलाची उंची अत्यंत कमी असल्याने, मुसळधार पाऊस सुरू होताच हा पूल पाण्याखाली जातो. खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक प्रशासनाकडून बंद करण्यात आली होती. या वाहतूक कोंडीमुळे शुक्रवारी आणि शनिवारी शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. सुदैवाने आज रविवार (5 जुलै 2026) असल्याने शाळांना सुट्टी होती, अन्यथा विद्यार्थ्यांची सलग तीन दिवस सुट्टी झाली असती. मात्र, असे असले तरी गावकऱ्यांना अत्यावश्यक कामासाठी गावाबाहेर पडणे कठीण झाले होते.
दरवर्षी पावसाळ्यात थोडा जरी मोठा पाऊस झाला, तरी या ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होते आणि पुलावरून पाणी वाहू लागते. त्यामुळे येथील रहिवाशांना बाजारहाट, बँक किंवा शासकीय कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जाणे अशक्य होते. सर्वात गंभीर बाब म्हणजे, गावातील एखाद्या आजारी रुग्णाला तातडीच्या उपचारासाठी मंडणगड, महाड किंवा माणगाव येथे हलवायचे असल्यास, वाहतूक खंडित झाल्यामुळे रुग्णांचे प्राण धोक्यात येतात.
“म्हाप्रल ते पन्हळी खुर्द मार्गावरील पन्हळी नदीवरील पुलाची उंची खूपच कमी आहे. दरवर्षी पावसाळ्यात हीच समस्या उद्भवते. शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजांसाठी गावकऱ्यांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या जीर्ण पुलाचे नव्याने बांधकाम करावे आणि पुलाची उंची वाढवावी, जेणेकरून पावसाळ्यातील ही वार्षिक डोकेदुखी कायमची मिटेल.” – संदिप वाघे (उप तालुका प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), तालुका: मंडणगड, जिल्हा: रत्नागिरी)
Comments are closed.