गुलमर्ग रोपवेमध्ये बिघाड झाल्याने घबराट.

300 पर्यटकांची सुखरुप सुटका : लष्कराकडून बचावकार्य

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू काश्मीरच्या प्रसिद्ध गुलमर्ग गोंडोलामध्ये सोमवारी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने रोपवे सेवा थांबल्याने गोंधळ उडाला. अंदाजे 300 पर्यटक हवेत वेगवेगळ्या केबिनमध्ये अडकल्याने लष्कराला पाचारण करून बचावकार्य राबवावे लागले. गोंडोला सुरू असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे केबल कार पुढे जाऊ शकली नाही. प्रवासी मध्येच अडकून पडल्यानंतर स्थानिक प्रशासन, अग्निशमन व आपत्कालीन सेवा पथकांना तात्काळ घटनास्थळी बोलावण्यात आले. सुदैवाने दिलासादायक बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग हे ठिकाण पर्यटनासाठी विशेष आकर्षणाचे केंद्र मानले जाते. येथील प्रसिद्ध गोंडोला केबल कार राइडचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळते. मात्र, याच गोंडोला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलमर्ग केबल कार सेवेदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने एकच खळबळ उडाली. केबल कारमध्ये बिघाड झाल्यामुळे गोंडोला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलमर्ग केबल कार सेवेच्या दोन्ही टप्प्यांवरील कामकाज स्थगित करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) केबल कारच्या केबिनमधून प्रवासाचा आनंद घेणाऱ्या शेकडो पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, केबल कार प्रणाली पूर्ववत करण्याचे काम सध्या सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

केबिनमध्ये अडकलेले सर्व प्रवासी सुरक्षित असून विविध यंत्रणांच्या मदतीने तीन ते चार तासांत परिस्थिती पूर्णपणे पूर्ववत झाल्याचे केबल कार कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सय्यद कमर सज्जाद यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. कोणतीही मोठी समस्या नव्हती, केवळ एक तांत्रिक बिघाड होता, असेही ते म्हणाले. या बचावकार्यात केबल कारची चार विशेष बचाव पथके सहभागी झाली होती. दुसरीकडे, सरकार संबंधित परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. सर्वजण सुरक्षित असून, अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रशिक्षित पथकांसह बचावकार्य सुरू आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे आणि घाबरण्याची गरज नाही, असे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडियावरून जाहीर केले होते.

Comments are closed.