गौरी पालवेंच्या मृत्यूनंतर वरळी पोलीस ठाण्यात सेटलमेंटचे प्रयत्न? बीडचा ‘तो’ व्यक्ती केबिनमध्ये


अनंत गर्जे आणि गौरी गर्जे गुन्हा: राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे (Anant Garje) यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे (Gauri Palve) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. वरळी येथे 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक तपासात हे प्रकरण आत्महत्येचे असल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, गौरीच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केलाय. या प्रकरणात अनंत गर्जेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला रविवारी रात्री अटक केली आहे. तर या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी रविवारी वरळी पोलीस ठाण्यात जात पोलिसांशी चर्चा केली होती. आता अंजली दमानिया यांनी डॉ. गौरी गर्जे मृत्यूप्रकरणात खळबळजनक आरोप केलाय.

अंजली दमानिया म्हणाल्या की, सकाळी आठ वाजता मला काल फोन आला. आम्ही बीडवरून आलो आहोत आणि आम्हाला मदत हवी आहे. आमच्या मुलीची आत्महत्या झाली आहे. यानंतर मी तत्काळ वरळी पोलीस स्टेशनला गेले, त्यावेळी आई वडील प्रचंड रडत होते. पहिला फोन त्यांना त्यांच्या जावयाचा आला. तो म्हणाला की, तुमची मुलगी आत्महत्या करत आहे, तिला समजवा. पाचव्या मिनिटाला फोन करून आईच्या फोनवर त्या जावयाने सांगितलं की, ती मयत झाली.

Anjali Damania on Gauri Garje Death: गौरीला मारहाण होत होती

या सगळ्यांमध्ये संशय निर्माण करणारी ही सगळी घटना आहे. गौरीच्या वडिलांनी माहिती दिली की, अनंतचे एका महिलेशी संबंध होते आणि गर्भपात करतानाचे फॉर्म भरावा लागतो, त्यात नवरा म्हणून अनंत गर्जे नाव लिहिलं होतं. त्यामुळे त्यांचे वाद होते.  गौरीच्या मैत्रिणी ज्या केएम रुग्णालयात होत्या, त्यांना सुद्धा मी विचारलं. तेव्हा त्या मैत्रिणी म्हणाल्या की, गौरीच्या चेहऱ्यावर मार्क असायचे. याचा अर्थ तिला मारहाण होत होती हे स्पष्ट होतंय. गौरी ही स्ट्राँग मुलगी होती ती अशी आत्महत्या करू शकत नाही, असं तिच्या घरच्यांचं म्हणणं आहे, असे देखील त्यांनी म्हटले.

Anjali Damania on Gauri Garje Death: सीनियर पीआयच्या केबिनमध्ये एक माणूस आला अन्…

अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की, अनंत गर्जे हे गौरी मयत झाल्यापासून ते आतापर्यंत गायब का होते? जेव्हा वरळी पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदवत होते, तेव्हा तिथे सासरचा एकही माणूस उपस्थित नव्हता. जर ही आत्महत्या होती तर त्यांनी गायब होण्याची गरज नव्हती. वरळी पोलीस स्टेशनला बीडच्या एका माणसाने सांगितले की, ताई इथे सेटलमेंटच्या गोष्टी एफआरआर दाखल करताना होत होत्या. सीनियर पीआयच्या केबिनमध्ये एक माणूस त्यांचा आला आणि म्हणतो एक माणूस तुमचा द्या आणि सेटलमेंट करू. एसीपींच्या समोर त्या व्यक्तीने सांगितले की, सेटलमेंटसाठी एका व्यक्तीने सांगितलं आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. तर सकाळी 6:00 वाजेपासूनच सीसीटीव्ही फुटेज वरळी पोलीस स्टेशनचं आम्हाला हवे आहे. त्यामध्ये कोण सीनियर पीआय भेटायला गेले होते हे स्पष्ट होईल, अशी मागणी देखील अंजली दमानिया यांनी केली आहे.

आणखी वाचा

Anant Garje & Gauri Garje Crime: गौरीशी कडाक्याचं भांडण, अनंत गर्जे घराबाहेर पडला, कार कोस्टल रोडवर असताना मनात संशयाची पाल चुकचुकली अन्…

आणखी वाचा

Comments are closed.