शॉकिंग! भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेऊन नवऱ्यानेच बायकोला संपवलं; मराठवाडा हादरला
परभणी : आपल्या व्हॉट्सअप अकाऊंटवर पत्नीसाठी भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून नवऱ्यानेच बायकोला संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परभणीच्या जिंतुर तालुक्यातील सोनपुर तांडा येथे पतीनेच पत्नीचा अतिशय निर्घुणपणे खून केल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सगळीकडे गणेशोत्सव सणाचा उत्साह पाहायला मिळत असून गावोगावी आनंदाचे आणि सणासुदीचे वातावरण आहे. गणपती भक्तीत घरोघरी, गावोगावी आनंद उत्साह असताना पती-पत्नीच्या वादात झालेला शेवट सर्वांना हळहळ करणारा आहे.
जिंतूर तालुक्यातील वाघी येथील विजय राठोड यांचा विवाह सोनपुर तांडा येथील विद्या विजय राठोड यांच्याशी झाला होता 3-4 दिवसांपुर्वी पती पत्नीमध्ये वाद झाला होता. पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या वादामुळे पत्नी विद्या ही माहेरी राहायला आली होती. विद्या आज त्यांच्या वडिलांच्या शेतात असताना तिथेही या पती-पत्नीमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यातून विजय राठोड याने हातातील धारदार हत्याराने पत्नीच्या छाती, पोट, पाठीवर 10 ते 12 वार केले. ज्यामध्ये विद्या गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे, गंभीर जखमी अवस्थेत तिला तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पारवे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
दरम्यान, या घटनेनंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला. भर पावसातही संतप्त जमावाने आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. महत्वाचे म्हणजे विजय राठोड याने हा खून करण्याआधी स्वतःच्या व्हॉट्सअप स्टेटसवर पत्नीचा फोटो आणि भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलेले स्टेटस ठेवले होते. विजय राठोडने त्याची पत्नी विद्या हिचा इतक्या निर्घुणपणे खून का केला? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तर, पोलिसांतही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे पोलीस तपासात नेमके काय समोर येते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा
मुंबईत मराठा आंदोलकांच्या गाडीला अपघात, 3 जखमी; मराठे राजधानीत दाखल, जरांगेंचं गावागावात स्वागत
आणखी वाचा
Comments are closed.