मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील यांची कसून चौकशी; पार्थ पवारांवरही अटकेची टांगती


पार्थ पवार मुंढवा जमीन घोटाळा : मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी (Mundhwa Land Scam Pune) एक मोठी माहिती समोर आली आहे. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी कॉमेडी कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील (Digvijay Patil) आणि पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून पाच दिवसांपूर्वीच दिग्विजय पाटील यांना नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. 2 डिसेंबर रोजी दिग्विजय पाटील पुणे पोलीस आयुक्तालयात हजर राहिले आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला.

आर्थिक गुन्हे शाखेने दिग्विजय पाटील यांची कसून चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीसाठी पुन्हा बोलावल्यास मी हजर राहीन, असे दिग्विजय पाटील यांनी पोलिसांना सांगितले. मात्र सध्या मला परदेशात जय पवारांच्या लग्नाला जायचे असल्याने, लग्नावरून परत आल्यानंतर मी पुन्हा चौकशीसाठी येईन, असेही दिग्विजय पाटील (Digvijay Patil) यांनी स्पष्ट केले. दिग्विजय पाटील यांच्या चौकशीदरम्यान अनेक मुद्द्यांची तपासणी झाल्याने, आता पार्थ पवार (Parth Pawar Mundhwa Land Scam) यांच्या अडचणी देखील वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पार्थ पवारांवरही अटकेची टांगती तलवार- (Parth Pawar Mundhwa Land Scam)

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा जय पवारांचा परदेशात म्हणजे बहारिन इथे शानदार लग्न सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे मुंढवा जमीन प्रकरणात जय पवारांचे सख्खे बंधू पार्थ पवारांवर अटकेची टांगती तलवार आहे. जय पवारांच्या लग्नाला दिग्विजय पाटीलही उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. मात्र दिग्विजय पाटलांवरही जमीन प्रकरणात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. काल शीतल तेजवानीला याच प्रकरणात अटक करण्यात आलीय. त्यानंतर आता दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल होणार का असा सवाल आहे. त्यातच अमेडिया कंपनीची 99 टक्के भागिदारी असलेले पार्थ पवारांवरही अटकेची टांगती तलवार आहे.

कोण आहेत दिग्विजय पाटील? (Who Is Digvijay Patil Land Scam)

१. धाराशिव जिल्ह्यातल्या तेर गावचे मूळचे रहिवासी…

2. पार्थ पवार यांचे मामा अमरसिंह पाटील यांचे दिग्विजय हे पुत्र…

3. दिग्विजय पाटील सध्या पुण्यात वास्तव्यास.

4. तेरमधली वडिलोपार्जित जमीन कसण्यासाठी, कौटुंबिक कार्यक्रम, मतदानासाठी जातात तेरला.

5. सध्या तेरामध्ये दिग्विजय पाटलांच्या कुटुंबातल्या कोणाचेही वास्तव्य नाही.

शीतल तेजवानीला आज कोर्टात हजर करणार- (Land Scam Pune Sheetal Tejwani)

पुणे येथील मुंढव्यातील 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणी (Land Scam Pune) आरोपी शीतल तेजवानीला (Sheetal Tejwani) पुणे पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून तिची चौकशी देखील करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी ही जमीन खरेदी करण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सुत्रधार म्हणून शीतल तेजवानीची याआधी दोन वेळा चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून शीतल तेजवानीचा जमिनीच्या गैरव्यवहारात थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर काल (3 डिसेंबर) अखेर अटकेची कारवाई करण्यात आली. तर आज (4 डिसेंबर) शीतल तेजवानीला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

संबंधित बातमी:

Land Scam Pune Who Is Sheetal Tejwani: पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहारातील मोठा मासा; पोलिसांकडून अटक, जमीन विकणारी शीतल तेजवानी कोण?

आणखी वाचा

Comments are closed.