“दीपक-शार्दुलला पैसे देऊन घरी पाठवा”, माजी क्रिकेटपटू एमआयच्या गोलंदाजांच्या कामगिरीवर भडकले
आयपीएल २०२६ मध्ये पाच वेळेचा विजेता मुंबई इंडियन्स (एमआय) ५ पैकी एक सामना जिंकत गुणतालिकेत नवव्या स्थानी आहेत. यामध्ये संघाने संपूर्ण विभागांमध्ये वाईट कामगिरी केली असली तरी त्यांच्या गोलंदाजांना टीकेला सामोरे जावे लागत आहेत. त्यातील वेगवान गोलंदाज दीपक चाहर आणि शार्दुल ठाकुर यांच्या कामगिरीवर तर दिग्गजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णामाचारी श्रीकांत यांनी फ्रॅंचायजीला त्यांची थकबाकी देऊन घरी पाठवा”, असा सल्ला दिला आहे. एमआयने घरच्या मैदानावर म्हणजे वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्जविरुद्ध सामना गमावल्यानंतर श्रीकांत यांनी वरील वक्तव्य केले आहे. त्या सामन्यात एमआयने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १९५ धावा केल्या होत्या आणि पंजाबने हे लक्ष्य केवळ १६.३ षटकातच पार केले.
पंजाबचे सलामीवीर प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्या हे जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत, मात्र एमआयने डावाची सुरूवात करण्यासाठी जसप्रीत बुमराहच्या जागी चाहरला पाठवले. त्याने त्याच्या पहिल्याच षटकात २१ धावा दिल्या आणि पंजाबची सुरूवात उत्तम झाली. बुमराहने पुढचे षटक टाकले. त्यामध्ये त्याने केवळ ५ धावा दिल्या. पुढे प्रभसिमनरने मिळालेल्या चांगल्या सुरूवातीचा फायदा घेतला आणि ३९ चेंडूत नाबाद ८० धावा केल्या. तसेच पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने ३५ चेंडूत ६६ धावा केल्या.
“मुंबई इंडियन्स चाहरला प्लेइंग इलेवनमध्ये कसे ठेवत आहेत, हे मला कळत नाही. त्यांनी त्याला कायमच का ठेवले हेही मला समजत नाही. पहिल्याच षटकात त्याने २१ धावा दिल्या. मागच्या सामन्यात त्याने २२ धावा दिल्या. २.३ षटकात ४५ धावा. आमचे सर शार्दुल ठाकूर यांनी ३ षटकात ४२ धावा दिल्या. त्यांनी एकूण ५.३ षटके गोलंदाजी करून ८७ धावा दिल्या”, असे श्रीकांत यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हटले आहे.
“जेव्हा तुमचे दोन प्रमुख गोलंदाज ५.३ षटकात ८७ धावा देत असतील, तेव्हा तुम्ही सामना कसा जिंकू शकता तुम्ही त्या दोघांनाही अंतिम ११ मध्ये खेळवू तरी कसे शकता मी हा प्रश्न सामन्याआधीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित केला होता. यावरून तुमच्या म्हणण्याचा असा अर्थ आहे का की त्यांच्याकडे गोलंदाजीचे चांगले पर्याय नाहीत त्यांना घरी पाठला. त्यांना पैसे द्या आणि या हंगामात परत न येण्याची विनंती करा. त्यांना सांगा की गरज पडेल तेव्हा त्यांना बोलावले जाईल,” असेही श्रीकांत यांनी पुढे म्हटले आहे.
पंजाबविरुद्ध बुमराहने ४ षटकात ४१ धावा दिल्या. तसेच मुंबईचे इतर गोलंदाजही चांगली कामगिरी करु शकले नाही. त्यांच्याकडून केवळ अल्लाह गजनफर याने चांगली कामगिरी केली. त्याने ४ षटकात ३१ धावा देत २ विकेट्स घेतल्या.
Comments are closed.