दिल्लीने जाता जाता पंजा मारला, पंजाबचा गेम बिघडला, मुंबई इंडियन्सने उद्याची मॅच जिंकली तर…
पीबीके वि डीसी हायलाइट आयपीएल 2025: आयपीएल स्पर्धेतील शेवटच्या काही साखळी सामन्यांच्या निकालामुळे गुणतालिकेत (Points table) बदल होताना दिसत आहेत. दिल्ली आणि पंजाबच्या संघात शनिवारी जयपूर येथे झालेल्या सामन्यातही अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला. या सामन्यात पंजाब किंग्जला (PBKS) दिल्ली कॅपिटल्सकडून 6 गडी राखून पराभव पत्करावा लागला. परिणामी गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनंतर पंजाब किंग्जनेही प्लेऑफपूर्वी अव्वल स्थान मिळवण्याची संधी गमावली आहे.
पंजाब किंग्जने कर्णधार श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीसमोर विजयासाठी 207 धावांचे लक्ष्य ठेवले होते. दिल्ली फलंदाजीला उतरल्यानंतर सुरुवातीला ठराविक अंतराने विकेटस पडत गेल्याने हे लक्ष्य गाठणे अवघड वाटत होते. मात्र, समीर रिझवी आणि करुण नायर यांच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या षटकात 207 धावांचे लक्ष्य गाठले. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात 4 चेंडूत 5 धावांची गरज होती. तेव्हा समीर रिझवीने षटकार खेचून दिल्लीच्या संघाला विजय मिळवून दिला.
या पराभवामुळे पंजाब किंग्जच्या संघाच्या पॉईंट टेबलमध्ये पहिल्या दोनमध्ये टिकून राहण्याच्या अपेक्षांना सुरुंग लागू शकतो. कारण उद्या म्हणजे सोमवारी पंजाबचा सामना मुंबई इंडियन्सच्या संघाविरुद्ध आहे. हा सामना अटीतटीचा होण्याची शक्यता आहे. मुंबईचा संघ सध्या टॉप फॉर्ममध्ये आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही बाबतीत मुंबईत इंडियन्सची कामगिरी मोक्याच्या क्षणी उंचावताना दिसत आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभव झाल्यास पंजाब किंग्ज टॉप दोनमधून खाली फेकला जाईल. मुंबई आणि पंजाब दोघांनी 13 सामने खेळले असून त्यांचे गुण अनुक्रमे 17 आणि 16 इतके आहे. कालच्या सामन्यात दिल्ली पराभूत झाली असती तर पंजाबला 2 गुण मिळून त्यांची गुणसंख्या 19 होऊन ते पहिल्या स्थानावर गेले असते. मात्र, कालच्या सामन्यात त्यांचा पराभव झाला. आता उद्या मुंबई इंडियन्सने पंजाबचा पराभव केला तर मुंबईची गुणसंख्या 18 होईल आणि पॉईंट टेबलमध्ये पहिले स्थान मिळेल. याउलट पंजाबचा पराभव झाल्यास 14 सामन्यात 17 गुण राहिल्यास ते चौथ्या स्थानावर फेकले जातील. त्यामुळे उद्याच्या एका सामन्याने आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते. गुजरात टायटन्सचा संघ 13 सामन्यांत 18 गुण मिळवून सध्या पहिल्या स्थानी आहे. पॉईंट टेबलमध्ये पहिल्या दोन स्थानांवर राहणाऱ्या संघांना क्वालिफायर राऊंडमध्ये एक अतिरिक्त संधी मिळणार आहे. त्यामुळे पॉईंट टेबलमध्ये पहिल्या दोन स्थानांवर राहण्यासाठी सर्व संघांची धडपड सुरु आहे.
https://www.youtube.com/watch?v=vuf_y5p_lju
आणखी वाचा
आयपीएलमध्ये इरफान पठाणला बाहेर ठेवलं, भारत-इंग्लंड दौऱ्यासाठी कमबॅक ठरलं, कुणी घेतला मोठा निर्णय
अधिक पाहा..
Comments are closed.