पेट्रोल-डिझेलचे दर 11 दिवसांत चौथ्यांदा वाढले आहेत

पुन्हा प्रतिलिटर अडीच ते तीन रुपये दरवाढ : 15 मे पासून दर साडेसात रुपयांनी भडकले

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

तेल विपणन कंपन्यांनी सोमवार, 25 मे रोजी इंधन दरात आणखी एका मोठ्या दरवाढीची घोषणा केली. नव्या निर्णयानुसार, पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.61 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2.71 रुपयांनी वाढ केली आहे. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर आता प्रतिलिटर 102.12 रुपये आणि डिझेलचा दर 95.20 रुपये झाला आहे. गेल्या दोन आठवड्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली ही चौथी वाढ आहे. आता याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 2.61 ने वाढून 102.12 रुपये झाला आहे. त्याचप्रमाणे, डिझेलच्या दरातही प्रतिलिटर 2.71 रुपयांची वाढ झाली असून दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत 95.20 रुपये झाली आहे. तेल कंपन्यांच्या मते, गेल्या 76 दिवसांपासून दर स्थिर ठेवल्यानंतर वाढत्या आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी हे पाऊल उचलणे अत्यावश्यक होते.

इंधनाच्या दरातील या अचानक वाढीमागे पश्चिम आशियामध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव हे प्रमुख कारण आहे. या संघर्षामुळे जगातील सर्वात महत्त्वाचा तेलमार्ग असलेली होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाली असून, जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती प्रतिबॅरल 100 डॉलरच्या पुढे गेल्या असून, भारतासारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थांवर याचा थेट परिणाम होत आहे. ओएनजीसीच्या संचालक सुषमा रावत यांच्या मते या प्रदेशात शांतता करार होण्याची आशा असेपर्यंत हा दरांमधील चढ-उतार सुरू राहू शकतो.

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर मार्च 2024 पासून स्थिर होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या अगदी आधी, सरकारने प्रतिलिटर 2 रुपयांनी दर कमी करून जनतेला दिलासा दिला होता. भारतात इंधनाच्या किमती तांत्रिकदृष्ट्या नियंत्रित असल्या आणि कंपन्या आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या 15 दिवसांच्या सरासरी किमतीच्या आधारावर दररोज दर बदलू शकत असल्या तरी राजकीय संवेदनशीलतेमुळे त्या बराच काळ अपरिवर्तित राहिल्या. मात्र, आता मध्य-पूर्वेतील तणावामुळे इंधनदरात सातत्याने वाढ केली जात आहे.

तेल कंपन्यांना दरमहा 30,000 कोटींचा तोटा

सरकारच्या मते, इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांसारख्या सरकारी कंपन्यांना आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे तोटा सहन करावा लागत होता. पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या विक्रीवर कंपन्यांना दरमहा अंदाजे 30,000 कोटी रुपयांचा फटका बसत असल्यामुळे आता दरवाढ करणे क्रमप्राप्त आहे.

इंधन दरवाढीचे परिणाम…

मालवाहतूक दर वाढणार : डिझेल दरवाढीमुळे वाहतूकदार संघटनांकडून ट्रक आणि टेम्पोचे भाडे वाढवले जाणार.

भाज्या-अन्नधान्य महागणार : वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाला, फळे, अन्नधान्य उत्पादने अधिक महाग होतील.

शेतीचा खर्च वाढणार : शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि पंपिंग सेट चालवण्यासाठी अधिक खर्च करावा लागल्यामुळे धान्याची किंमत वाढेल.

बस-ऑटोचे भाडे महागणार : सार्वजनिक वाहतूक, ऑटो आणि शालेय बसच्या भाड्यातही वाढ होऊ शकते.

Comments are closed.