क्वालिफायर-1 जिंका अन् ट्रॉफी उचला! आयपीएल इतिहासातील धक्कादायक आकडे समोर

आयपीएल 2026 आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून 26 मे पासून प्लेऑफच्या लढतींना सुरुवात होत आहे. मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात क्वालिफायर-1 सामना रंगणार आहे. धर्मशाळामध्ये होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला थेट फायनलचे तिकीट मिळणार, तर पराभूत संघाला क्वालिफायर-2 खेळावा लागणार आहे.

विशेष म्हणजे, आयपीएल इतिहास पाहता क्वालिफायर-1 जिंकणारा संघच बहुतांश वेळा चॅम्पियन ठरला आहे. 2011 पासून प्लेऑफ पद्धत सुरू झाल्यानंतर 15 पैकी तब्बल 12 वेळा पहिला क्वालिफायर जिंकणाऱ्या संघाने ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने क्वालिफायर-1 जिंकून अंतिम फेरीत पंजाब किंग्जला पराभूत करत पहिले विजेतेपद पटकावले होते. त्याआधी 2022 मध्ये गुजरात टायटन्सने पहिला क्वालिफायर जिंकून अंतिम सामन्यात राजस्थान रॉयलवर मात केली होती.

मात्र, तीन वेळा असे घडले की क्वालिफायर-1 जिंकूनही संघ ट्रॉफीपासून दूर राहिला. 2013 मध्ये चेन्नई सुपर किंग्जला अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला. 2016 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फायनलमध्ये हरली, तर 2017 मध्ये रायझिंग पुणे सुपर जायंट्सला अवघ्या एका धावाने मुंबई इंडियन्सने नमवलं होतं. विशेष म्हणजे 2018 ते 2025 दरम्यान क्वालिफायर-1 जिंकणाऱ्या प्रत्येक संघाने किताब जिंकला आहे.

दरम्यान, धर्मशाळातील एचपीसीए स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी मानली जाते. तरीही यंदाच्या हंगामात येथे झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये पहिल्या डावात 200 पेक्षा जास्त धावा झाल्या आहेत. सुरुवातीला सीम मूव्हमेंट आणि अतिरिक्त बाऊन्स मिळत असली तरी फलंदाजांनी सेट झाल्यानंतर मोठे फटके सहज खेळले आहेत. त्यामुळे आज मंगळवारी होणारा क्वालिफायर-1 सामना हायस्कोरिंग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पॉवरप्लेमध्ये कोणता संघ चेंडूने वर्चस्व गाजवतो, यावर सामन्याचं चित्र ठरणार आहे.

Comments are closed.