गोपाळ बदनेच्या चौकशीसाठी जयकुमार गोरेंच्या निष्ठावंत पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती: मेहबुब शेख


फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणावरुन  राज्यभरातील वातावरण सध्या तापले आहे. या तरुणीने आत्महत्येपूर्वी हातावर लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये (Suicide news) पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने (Gopal Badne) आणि खासदाराच्या दोन स्वीय सहाय्यकांचा उल्लेख केला होता. या सगळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होईल. दोषींपैकी कोणालाही सोडले जाणार नाही, असे आश्वासनही दिले होते. मात्र, आता डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी भाजप नेते जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या जवळचा पोलीस अधिकारी नेमण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाचे पदाधिकारी मेहबुब शेख यांनी केला आहे. ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

या प्रकरणातील मुख्य आरोपी याने आपल्यावर चारवेळा बलात्कार केला. तसेच तो आरोपींना फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी आपल्यावर दबाव आणायचा, असे मृत डॉक्टर तरुणीने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले होते. त्याची खात्यातंर्गत चौकशी करण्यासाठी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. घनश्याम सोनावणे आणि त्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री तब्बल साडेचार तास गोपाळ बदनेची चौकशी केल्याची माहिती आहे. या चौकशीत बरीच धक्कादायक माहिती समोर आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र, घनश्याम सोनावणे हा अधिकारी भाजप नेते जयकुमार गोरे यांच्या जवळचा असल्याचा आरोप मेहबुब शेख यांनी केला आहे.

घनश्याम सोनावणे याची गोपाळ बदनेच्या चौकशीसाठी नियुक्ती होणे, हा एक सापळा वाटत आहे. देवाभाऊ तुम्हाला दुसरा अधिकारी भेटला नाही का? हा अधिकारी जयकुमार गोऱ्हे यांना भेटला होता. त्याची स्वामी निष्ठा किती हे पहा.. हा म्हणतो ‘आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’. गोपाळ बदनेच्या चौकशीसाठी असाच अधिकारी भेटला का तुम्हाला, असा सवाल मेहबुब शेख यांनी विचारला. या अधिकाऱ्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी असणारे संबंधही पाहा. जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने नग्न फोटो पाठवल्याचे आरोप केले होते तेव्हा घनश्याम सोनावणे यांनीच या प्रकरणाचे वार्तांकन करणारे पत्रकार तुषार खरात यांचे सगळे साहित्य जप्त केले होते.

खासदार रणजितसिंह निंबाळकर हे काल एका वेस्टिन हॅाटेलला आले होते. त्यावेळी काही ठरले का? जर कुटुंबातील लोक एसआयटीची मागणी करत आहेत तर विशेष तपास पथक का नेमले जात नाही? म्हसवड परिसरात वैद्यकीय पुरावे बदलले जात असल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. मृत डॉक्टर तरुणीच्या भावाने सांगितले की, तरुणीचे शवविच्छेदन करत असताना त्याला इतरत्र गुंतून ठेवण्यात आले होते, असा दावा मेहबुब शेख यांनी केला. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. मग मृत डॉक्टर तरुणीचे काय झाले असेल, असा सवालही मेहबुब शेख यांनी विचारला. यावर आता जयकुमार गोरे किंवा रणजितसिंह नाईक निंबाळकर काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

एकनाथ शिंदेंसोबत गप्पा मारतानाचे फोटो, रोहित आर्य ज्या योजनेमुळे आयुष्यातून उठला ती महत्त्वाकांक्षी सरकारी योजना नेमकी काय होती?

आणखी वाचा

Comments are closed.