Photo – पुण्यात हवाई प्रात्यक्षिकांचा थरार
२७ नोव्हेंबर २०२६ रोजी भारतीय हवाई दलाच्या ‘नो युवर फोर्सेस’ (Know Your Forces) अभियानांतर्गत एअर फोर्स स्टेशन, लोहगाव यांच्याकडून पुण्याच्या आकाशात भव्य हवाई प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सुमारे २० हजार प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये प्रामुख्याने शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘आकाश गंगा’ पथकाने सादर केलेली अचूक स्कायडायव्हिंगची प्रात्यक्षिके, सुखोई-३० एमकेआय विमानांनी सखल उंचीवरून केलेली चित्तथरारक हवाई कसरती, चेतक हेलिकॉप्टरचे फ्लायपास्ट तसेच ‘सूर्यकिरण’ आणि ‘सारंग’ प्रात्यक्षिक पथकांनी सादर केलेली लक्षवेधी हवाई रचना ही होती. या नेत्रदीपक प्रात्यक्षिकांना उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. भारतीय हवाई दलाची कार्यान्वयन क्षमता दाखवून देणे आणि तरुणांना हवाई दलात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागील मुख्य उद्देश होता.
एअर फोर्स स्टेशन, लोहगाव येथे विमानांसह लष्करी उपकरणांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. यामुळे तरुणांना भारतीय हवाई दलाच्या जवानांशी थेट संवाद साधण्याची आणि त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची संधी मिळाली.
एअर फोर्स स्टेशन, लोहगावचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर सतबीर सिंग राय, व्हीएम यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नागरी प्रशासनाने दिलेल्या संपूर्ण सहकार्याबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले तसेच त्यांचे कौतुक केले.
Comments are closed.