EVM मशीनमध्ये तुमची 2500 मतं फिक्स, राजकीय फोडाफोडीसाठी भाजपचं आमिष, अजित पवार गटाच्या नेत्याचा
Pimpri Chinchwad Election 2026: पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेत भाजपला त्यांचा अतिआत्मविश्वास आणि घमेंड नडेल. याठिकाणी भाजपचे नेते 125 जागा जिंकण्याची भाषा करत आहेत. पण त्यांनी 125 जागा जिंकल्या तर मी राजकारण कायमचं सोडून देईन, असे वक्तव्य अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते योगेश बहल यांनी केले. भाजपकडून ‘अबकी बार 125 पार’ नारा दिला जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये विरोधकांच्या फक्त तीन जागा निवडून येतील, असे भाजपकडून सांगितले आहे. मात्र, प्रत्यक्षात पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला 100 जागा निवडून आणणेही अवघड आहे, असे योगेश बहल यांनी म्हटले. ते शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी योगेश बहल यांनी भाजपवर गंभीर आरोपही केले. भाजपने ईव्हीएम मशीन सेट केल्या आहेत की नाही, ते मला माहिती नाही. पण भाजपकडून पिंपरी चिंचवडमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. ते अन्य पक्षातील नेत्यांना सांगत आहेत की, आमच्याकडे या. ईव्हीएम मशीनमध्ये तुम्हाला दोन ते अडीच हजार मतं आपोआप मिळतील. बाकी मदतही आम्ही करु, असे भाजपकडून लोकांना सांगितले जात आहे. जे लोक आम्हाला सोडून गेले आहेत, त्यांना स्वत:वर विश्वास नाही. अजित पवार यांच्यासारखा उमदा नेता उभ्या महाराष्ट्रात मिळणार नाही. अशा नेत्याला सोडून गेल्यास काय मिळणार हे मला समजत नाही. अजित पवार हे पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार आहेत, त्यांनी या शहराचे नंदनवन केले आहे. आंधळ्या व्यक्तीला विचारलं तरी तो अजित पवारांनी या शहरासाठी काय केलंय, हे सांगेल. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता येईल, असा विश्वास योगेश बहल यांनी व्यक्त केला.
आमच्याकडील जी सात-आठ लोकं भाजपमध्ये गेली आहेत, त्यांना स्वत:वर विश्वास नाही. भाजपला पिंपरी-चिंचवडध्ये ब्लाईंड फेथ आणि ब्लाईंड कॉन्फिडन्स आहे. आगामी काळात ते दिसून येईल. भाजपला त्या घमेंडीत राहू द्या. पिंपरी चिंचवडची जनता भाजपला त्यांची जागा दाखवून देईल, असे योगेश बहल यांनी म्हटले. या टीकेला आता भाजपकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.