प्लास्टिकच्या नोटा लवकरच चलनात येणार आहेत.

आरबीआयकडून कच्च्या मालासाठी जागतिक निविदा जारी : पहिल्या टप्प्यात 10-20 च्या नोटांची चाचणी : 2027 मध्ये पूर्ण-प्रमाणात वापर अपेक्षित

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच भारतात कागदी नोटांच्या जागी प्लास्टिक किंवा पॉलिमर नोटा चलनात आणण्याची तयारी करत आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, आरबीआय लवकरच देशात पॉलिमर नोटा आणण्यासाठी एक प्रायोगिक प्रकल्प सुरू करणार असून त्यासाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून आरबीआयच्या नोट छपाई विभागाने नोटांच्या छपाईसाठी अपारदर्शक पॉलिमर सबस्ट्रेट शीट्स (प्लास्टिक नोटा बनवण्यासाठी वापरला जाणारा मूळ पदार्थ) करिता जागतिक निविदा जारी केली आहे. ‘ईओआय’ अंतर्गत निविदा सादर करण्याची अंतिम मुदत 18 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे.

आरबीआय देशात प्लास्टिक किंवा पॉलिमर नोटांचा पहिला प्रायोगिक प्रकल्प सुरू करणार आहे. देशात नवीन टप्प्यातील चलन आणण्याच्या आरबीआयच्या योजनेतील हे पुढचे पाऊल आहे. सुरुवातीच्या टप्प्यात, रिझर्व्ह बँक प्रथम लहान मूल्यांच्या नोटांची चाचणी घेईल. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिला प्रायोगिक प्रकल्प 10 आणि 20 रुपयांच्या लहान मूल्यांच्या नोटांवर सुरू होण्याची शक्यता आहे.

प्रायोगिक चाचणीतील यश आणि अनुभवाच्या आधारावर आरबीआय पुढील निर्णय घेईल. जर ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली, तर आरबीआय 2027 पर्यंत देशात या पॉलिमर नोटांचा पूर्ण-प्रमाणात वापर सुरू करू शकते. देशाच्या चलनाचे आयुष्य वाढवण्यासाठी आणि त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी पॉलिमर नोटा सादर करण्याची इच्छा आरबीआयने यापूर्वी व्यक्त केली आहे. लवकरच सुरू होणारा हा प्रायोगिक प्रकल्प पहिली व्यावहारिक चाचणी असेल. तथापि, आरबीआयने अद्याप या प्रकरणी अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

आरबीआयकडून जागतिक निविदा जारी

आरबीआयच्या नोट-मुद्रण युनिटने जागतिक स्तरावर ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट‘ (ईओआय) जारी केल्यानंतर या संपूर्ण प्रकल्पाच्या तयारीला गती मिळाली. ही निविदा या नोटा छापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एका विशेष प्रकारच्या पॉलिमर सबस्ट्रेट शीटच्या उत्पादन आणि पुरवठ्यासाठी मागवण्यात आली होती. कागदपत्रांनुसार, जगभरातील उत्पादकांना प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज पॉलिमर सबस्ट्रेट्सचा पुरवठा करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या निविदेसाठी बोली सादर करण्याची अंतिम मुदत 18 ऑगस्ट आहे.

जुन्या कागदी नोटाही वैध राहणार

भारतीय बाजारपेठेत पॉलिमर नोटा आणल्या जात असल्या तरी सध्याच्या कागदी नोटा लगेचच चलनातून बाहेर जाणार नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. नवीन चलन जुन्या कागदी नोटांची जागा घेणार असून दोन्ही प्रकारच्या नोटांची वैधता कायम राहणार आहे. तथापि, खराब होत असलेल्या कागदी नोटा बँकांमध्ये जमा करण्याचा पर्यायही दिला जाऊ शकतो. हा बदल हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने केला जाईल. नवीन नोटा पूर्णपणे प्रस्थापित होईपर्यंत कागदी नोटा चलनात राहतील.

पाणी-धुळीपासून पूर्णपणे सुरक्षित

पॉलिमर/प्लास्टिकपासून बनवलेल्या नोटा पारंपरिक कागदी नोटांपेक्षा खूप जास्त टिकाऊ असतील. या नोटा पाणी, घाण आणि धुळीला प्रतिरोधक आहेत. शिवाय, त्या फाटणार नसल्यामुळे त्या बाजारात दीर्घकाळपर्यंत अबाधित आणि स्वच्छ राहतील. पॉलिमर शीटचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे त्यामध्ये प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यो सहजपणे समाविष्ट केली जाऊ शकतात. साहजिकच, बनावट नोटा तयार करणाऱ्यांना त्यांची नक्कल करणे जवळजवळ अशक्य असल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल.

जगभरात 60 देशांमध्ये प्लास्टिक नोटा चलनात

अनेक विकसित देशांमध्ये पॉलिमर नोटा बऱ्याच काळापासून वापरात आहेत. जगभरातील अंदाजे 60 देशांमध्ये पॉलिमर नोटा चलनात आहेत. याची सुरुवात सर्वप्रथम ऑस्ट्रेलियामध्ये झाली. त्यानंतर कॅनडा, ब्रिटन, सिंगापूर, न्यूझीलंड, मलेशिया, थायलंड, रोमानिया आणि ब्रुनेईमध्ये याचा विस्तार झाला. आता, भारतातही याची ओळख करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Comments are closed.