हजारो कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन अभिप्राय पाठवा
हरियाणात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कार्यक्रम, विकासकामांमध्ये राजकारण न आणण्याचा निर्धार
वृत्तसंस्था, चंदीगढ
हरियाणा राज्याच्या जिंद जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 हजार 700 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले आहे. तसेच त्यांनी काही प्रकल्पांच्या कामकाजाचा प्रारंभही कोनशीला स्थापन करुन केला आहे. भारताच्या प्रथम हैड्रोजन रेल्वेगाडीलाही त्यांनी हरित ध्वज दाखवून या गाडीचा प्रारंभ केला. जास्तीत जास्त विकास कामे घडवून भारताची आर्थिक प्रगती साधण्याचे केंद्र सरकारचे ध्येय आहे, असे प्रतिपादन त्यांनी या कार्यक्रमात केले.
हरियाणात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील सरकार स्थापन झाल्यापासून हरियाणाच्या विकासाला मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. या राज्यात केंद्र सरकारच्या वतीने अनेक प्रकल्प पूर्ण करण्यात आले असून आज लोकांना त्यांचा लाभ होत आहे, असे त्यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केले. त्यांनी शुक्रवारी ज्या प्रकल्पांचे उद्घाटन केले, त्यांच्यात अनेक रेल्वे प्रकल्प, महामार्ग प्रकल्प, आरोग्य आणि सांस्कृतिक पायाभूत सुविधा प्रकल्प आणि इतर काही प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांसाठी एकूण 14 हजार 700 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल.
वैद्यकीय महाविद्यालयाचे राष्ट्रार्पण
गुरुवारच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पंडित नेकीराम शर्मा वैद्यकीय महाविद्यालया’चे राष्ट्रार्पण करण्यात आले. हे महाविद्यालय हरियाणातील भिवानी येथे निर्माण करण्यात आले आहे. तसेच, नरनौल येथे निर्माण करण्यात आलेल्या महर्षी च्यवन वैद्यकीय महाविद्यालयाचेही राष्ट्रार्पण त्यांनी केले आहे. या महाविद्यालयाला जोडून असणाऱ्या राव तुलाराम रुग्णालयाचेही राष्ट्रार्पण केले गेले.
प्रगतीचा आढावा
उद्घाटन कार्यक्रम पार पडल्यानंतर उपस्थित जनसमुदायाला संबोधताना त्यांनी गेल्या 12 वर्षांमध्ये भारताने विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी सरकारने अनेक योजना हाती घेतल्या. त्यांच्यापैकी बहुतेक सर्व योजना पूर्णत्वास गेल्या आहेत. हे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे यश आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
रेल्वेचे विद्युतीकरण वेगात
देशात 1925 पासून 2014 पर्यंत केवळ 30 टक्के रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण केले जाऊ शकले होते. तथापि, आमचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर गेल्या 12 वर्षांमध्ये 99 टक्के रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण झाले आहे. हरियाणात तर 100 टक्के रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण झालेले आहे. हा विक्रमी वेग केंद्र सरकारच्या धोरणांचे फळ आहे. यासमवेतच देशात विक्रमी प्रमाणात महामार्गांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे आज वाहतूक वेगात होत आहे. कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी सुधारणा झाल्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाचा वेग आणि आर्थिक स्थिरता या दोन्हींमध्ये मोठी वाढ होणार आहे. आज आम्ही जी कामे करीत आहोत, त्यांचा लाभ देशाला येत्या काही वर्षांमध्ये मिळण्यास प्रारंभ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आव्हानात्मक काळातही विकास स्थिर
गेल्या दीड वर्षांमध्ये जगासमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. आखातातील युद्धामुळे पुरवठा साखळ्या तुटल्या आहेत. याचा परिणाम देशाच्या अर्थव्यस्थेवर होणे शक्य होते. तथापि, अत्यंत जटील आव्हानांना तोंड द्यावे लागूनही आमची अर्थव्यवस्था सुस्थिर आहे. आम्ही ही आव्हाने आधीच ओळखून पूर्वसज्जता केली होती. त्यामुळे या आव्हानांना आम्ही समर्थपणे सामोरे जाऊ शकलो. भारताच्या अर्थव्यवस्था विकासाचा दर जगात सर्वाधिक राहिला, हे सर्व भारतीय नागरीकांनी केलेल्या सहकार्याचे फळ आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
उपयुक्त प्रकल्प
पंतप्रधान मोदी यांनी पंजाबमध्येही उद्घाटित केले प्रकल्प
विकास कामांमध्ये राजकारण न आणण्याचे धोरण अतिमहत्वाचे
देशातील 99 टक्के रेल्वेमार्गांचे झाले आहे विद्युतीकरण
ड रेल्वे, महामार्ग यांच्यामुळे कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा, विकासदर वाढणार
Comments are closed.